चोरलेले ट्रक किंवा आलिशान कार तोडून भंगारात विकण्याचे मोठे रॅकेट सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्यानजीक डोंगराळ भागात उघडकीस आले आहे. उस्मानाबादहून चोरलेला ट्रक जीपीएस प्रणालीमुळे या भागात आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आले.
वाहने तोडण्यासाठी गॅस कटर, क्रेन आदी अत्याधुनिक यंत्रांचा वापर करण्यात या चमूचा हातखंडा आहे. चोरून आणलेली वाहने तोडून त्यातील काही भाग दरीत टाकण्यात येतो आणि महत्त्वाचे भाग जमिनीत खड्डे खणून पुरले जातात आणि काही दिवसानंतर त्याची विक्री केली जाते. उस्मानाबाद येथील एक ट्रक चोरीला गेला होता. या ट्रकमध्ये जीपीएस प्रणाली असल्याने हा ट्रक नेमका कुठे आहे याचा तपास त्याच्या मालकाला लागू शकला. उस्मानाबाद पोलिसांच्या सहकार्याने तो कुंडलपर्यंत येऊन पोहोचला.
 या चोरीचा खरा सूत्रधार बेंगलोरचा असून वाहने चोरणारी ही आंतरराज्यीय टोळी असण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांनी जर अधिक तपास केला, तर अनेक वाहनांच्या चोरीचे प्रकार  उघड होण्याची शक्यता आहे.
उस्मानाबाद येथून चोरलेल्या ट्रकमध्ये जीपीएस प्रणाली  असल्याने या ट्रक मालकाने या चोरीचा मागोवा घेतल्याने या मोठय़ा आंतरराज्यीय रॅकेटचा उलगडा झाला आहे. उस्मानाबाद येथील एका पेट्रोलपंप मालकाचा टँकर चोरीला गेला होता. या संदर्भात त्याने उस्मानाबाद पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ट्रकमध्ये जीपीएस प्रणाली कार्यान्वित असल्याने या ट्रकचा मागोवा घेत उस्मानाबाद पोलिसांच्या सोबत मालक आणि त्याचे सहकारी सागरेश्वर अभयारण्याच्या परिसरात पोहोचले. मात्र तेथे आल्यानंतर जीपीएस सिस्टीमचा सिग्नल बंद झाल्याने ट्रक कोठे आहे याचा पत्ताच लागत नव्हता.  काहीशी निराश झालेली उस्मानाबादची मंडळी एका चहाच्या टपरीवर थांबली असतानाच त्यांना एका ट्रकमधून मोडक्या ट्रकचे भंगार नेताना दिसले. हे भंगार आपल्याच ट्रकचे असल्याचे जाणवल्यानंतर त्यांनी या ट्रकचा पाठलाग करून या वाहन चोरांना कुंडल पोलिसांच्या मदतीने पकडले आणि एका आंतरराज्यीय वाहन चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.
सांगली पोलिसांच्या मदतीने अधिक तपासात अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. अभयारण्यातील निर्मनुष्य परिसरात हे चोरीचे वाहन तोडण्याचे केंद्र आहे. या परिसरात दहा फूट उंचीचे खड्डे करून चोरून आणलेली वाहने त्यांचे वेगवेगळे भाग येथे पुरले जातात नंतर काही दिवसांचा कालावधी गेल्यानंतर या वाहनांच्या स्पेअर पार्ट्सची विक्री केली जाते आणि उर्वरित वस्तू भंगारात विकल्या जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा