ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमवेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी खारघरमधील या पुरस्कार सोहळ्यात केलेल्या भाषणादरम्यान आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या धर्माधिकारी या नावाचा इतिहास उपस्थित श्री परिवारातील सदस्य आणि नागरिकांना सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला लाखोंच्या संख्येनं श्री परिवारातील सदस्य आणि नागरिकांची उपस्थिती दिसून आली. कार्यक्रम स्थळापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झाल्याचंही चित्र दिसून आलं. मात्र, कार्यक्रम स्थळी नियोजनपूर्वक पद्धतीने सर्व श्रोते बसल्याचं चित्रही दिसून आलं. यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीसांनी याचाही उल्लेख केला.

नानासाहेब धर्माधिकारींचाही झाला होता ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानं गौरव!

“हा विलक्षण योगायोग आहे की नानासाहेब धर्माधिकारींच्या जन्मशताब्दी वर्षात आप्पासाहेब धर्माधिकारींना हा पुरस्कार मिळतो आहे. यापूर्वी नानासाहेबांचा पुरस्कार घेण्यासाठी आप्पासाहेब आले होते, तेव्हा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये त्या सोहळ्याची नोंद झाली होती. सर्वाधिक लोक एका ठिकाणी जमा झाले होते. लोक निघून गेल्यानंतर कचऱ्याचा चिटोराही तिथे नव्हता. तेव्हा वाटलं की हा विक्रम कुणीही मोडू शकत नाही. आज तो विक्रम मोडला गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्याहीपेक्षा जास्त लोक कार्यक्रमाला आल्याचं दिसत आहे”, असं फडणवीस म्हणाले.

धर्माधिकारी नावाचा इतिहास!

यावेळी फडणवीसांनी बोलताना धर्माधिकारी नावाचा इतिहास आपल्या वाचनात आल्याचं सांगितलं. “आप्पास्वारी माझ्या एक गोष्ट वाचण्यात आली की मुळात आपल्या घराण्याचा इतिहास साडेचारशे वर्षांचा आहे. आपल्या आठ पिढ्यांपूर्वी गोविंद चिंतामण शांडिल्य हे महाराजांच्या काळात धर्मजागृतीचं काम करत होते. त्या कामाचं स्वरूप पाहिल्यानंतर महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी सांगितलं की आपण केवळ शांडिल्य नाही आहात तर आपण धर्माधिकारी आहात. तेव्हापासून महाराजांच्या प्रेरणेनं हे ‘धर्माधिकारी’ नामाबिरूद लागलं. तिथपासून पिढ्यान् पिढ्या हे धर्मजागरणाचं कार्य आपल्या माध्यमातून होतंय”, असं फडणवीस म्हणाले.

“छत्रपतींची जगदंब तलवार आणि वाघनखं महाराष्ट्रात दर्शनासाठी आणणार”, सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा!

यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेनं श्री परिवाराकडून केल्या जाणार्या समाजकार्यांचीही माहिती दिली. “आप्पासाहेबांचं कार्य अफाट आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य, व्यसनमुक्तीच्या कार्यामुळे लाखो परिवार लाभान्वित झाले आहेत. वृक्षारोपणाचं व्यापक कार्य पार पडलं. २५ लाखांपेक्षा जास्त वृक्ष श्री परिवारानं लावले आहेत. पाच जंगलांचं व्यवस्थापन हा परिवार आज करतो आहे. १६ हजार साधक सातत्याने जलव्यवस्थापनाचं काम करत आहेत. ६४२ टन गाळ श्री परिवारानं काढून विहिरी, नद्या, ओढे, नाले स्वच्छ करण्याचं काम केलं. १३ जिल्ह्यांमध्ये जलपुनर्भरणाचं काम परिवाराच्या माध्यमातून झालंय. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, कतार अशा वेगवेगळ्या देशांत रक्तदान शिबिरं घेण्यात आली”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appasaheb dharmadhikari shree pariwar maharashtra bhushan award devendra fadnavis speech pmw