ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांचाही या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्यामुळे एकाच कुटुंबात दोन व्यक्तींना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी बोलताना निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपली भूमिका मांडताना श्वास चालू असेपर्यंच हे काम असंच चालू ठेवणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला.
अमित शाह यांचे मानले आभार
यावेळी बोलताना आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांचे आभार मानले. “भारताचा गृहखातं आणि सहकारखातं सांभाळताना एवढं काम असूनही ते आपल्या सर्वांसाठी इथे हजर राहिले आहेत. हा माझ्या आयुष्यातला भाग्याचा क्षण आहे. हा पुरस्कार नेहमी मोठाच असतो. तो लहान कधीच नसतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार मला दिला गेला. कारण कार्य श्रेष्ठ आहे. कार्याचा तो सन्मान आहे. याचं श्रेय आपल्या सगळ्यांना जातं. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार एकाच घरात दोनदा देणं हे महाराष्ट्रात कुठेच झालेलं नाही. हे राज्य सरकारने केलेलं एक महान कौतुक आहे”, असं आप्पासाहेब धर्माधिकारी यावेळी म्हणाले.
“नानांनी हे काम १९४३ पासून सुरू केलं. तेव्हा आधी खेडेगावापासून सुरूवात केली. लोक सांगायचे शहरात जा. पण नाना म्हणायचे शहरात जायची गरज नाहीये. खेडेगावातल्या लोकांच्या अंधश्रद्धा, वागणूक याला वळण लागलं पाहिजे, अंत:करणात सुविचार ठेवून प्रत्येकाला वागणूक करता आली पाहिजे असा विचार होता. त्यामुळे आपण खेडेगावापासून सुरूवात केली”, असं ते म्हणाले.
“मी प्रसिद्धीपासून लांबच राहातो”
दरम्यान, आपण प्रसिद्धीपासून लांबच राहातो, असं आप्पासाहेब यावेळी म्हणाले. “कोणत्याही प्रकारची जाहिरात नाही, गवगवा नाही. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. प्रसिद्धीमधून काहीही साध्य होत नसतं. महत्त्वाच्या गोष्टीची जाहिरात करायची गरज काय? पण जाहिरात करणाऱ्यांसंदर्भात माझा राग नाही. मानवता धर्म श्रेष्ठ आहे. तो प्रत्येकाच्या मनात रुजू व्हायला हवा. त्यासाठीच आमचा हा खटाटोप आहे. नानासाहेबांनी ८७ वर्षांपर्यंत काम केलं आहे. आता जिवात जीव असेपर्यंत, श्वास चालेपर्यंत हे काम मी चालू ठेवणार आहे. माझ्यानंतर उत्तराधिकारी म्हणून सचिनदा धर्माधिकारी तुम्हाला परिचित आहेत. तोही हे कार्य अखंडपणे करणार आहे. कार्य चालू राहातं. कार्य श्रेष्ठ आहे. कार्य उत्तम असेल, तर देहाला सन्मान मिळत असतो”, असं आप्पासाहेब धर्माधिकारी यावेळी म्हणाले.
“महाराष्ट्रभूषण पुरस्कार नानांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित आहे. कोणताही पुरस्कार उच्च असतो. आज समाजाचे, देशाचे ऋण आपल्यावर आहेत. ते फेडण्यासाठी आपण काय केलंय? आपण त्यांची काय सेवा केली? हे फार महत्त्वाचं आहे. समाजाची सेवा करण्यासाठी काय करावं लागतं? हेच आम्ही सांगत असतो. प्रत्येकानं अखंड सेवा करायला पाहिजे. फक्त बोलून होत नाही”, असंही आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी यावेळी नमूद केलं.