ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना थोड्याच वेळात राज्य शासनाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात येणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा न भूतो न भविष्यति असा होण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक लक्ष दिलं आहे. हा महासोहळा सुरळीत पार पडावा याकरता जय्यत तयारी करण्यात आली असून सर्व सुविधा कार्यक्रमस्थळी सज्ज ठेवण्यात आले आहेत. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत.
आज (१६ एप्रिल) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. हा भव्य कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरता महापालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम, पोलिस, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि श्री सदस्य संयुक्तरित्या मेहनत घेत आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
हेही वाचा >> नवी मुंबई: हेलिकॉपर मधून श्री सदस्यांवर पुष्पवृष्टी
वैद्यकीय सेवेसह सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त
या महासोहळ्यात वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, अनेक श्री सदस्यही उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी चोख नियोजन आखण्यात आले आहे. कार्यक्रमाला येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरता पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहन तळ, वाहतूक व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. सोहळ्याच्या ठिकाणी सुमारे २५० टँकर आणि २१०० नळ बसविण्यात आले आहेत. आपत्कालीन काळात वेळेत वैद्यकीय सुविधा मिळावी याकरता ६९ रुग्णावाहिका, ३५० डॉक्टर्स, १०० नर्स आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ३२ फिरते शौचालय, ४२०० पोर्टेबल शौचालय, कार्यक्रमस्थळी ९००० तात्पुरते शौचालय बांधण्यात आली आहेत. स्वच्छता व्यवस्थेसाठी ६० जेटींग मशीन, ४००० सफाई कर्मचारी शिवाय २६ अग्निशमन वाहने उपलब्ध आहेत. पार्कींगसाठी २२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ६०० स्वयंसेवक, २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा >> मुंबई जिंकण्यासाठी शहांकडून तयारीचा आढावा, शिंदे-फडणवीस यांच्याशी चर्चा; शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यावर भर
मुख्यमंत्र्यांचे जातीने लक्ष
“या सोहळ्याची इतिहासात नोंद घेतली जाईल, ना भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम होईल”, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसंच, सोहळ्याच्या आयोजनात सहभागी अधिकारी, कर्मचारी, श्री सदस्य यांना सोहळा यशस्वीतेसाठी आवाहन केले आहे.