राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘‘राजे हो, मंत्र्यांनी व खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन निश्चलनीकरणाचे फायदे जनतेला सांगावे या नमोंच्या आदेशाला जागून मनुष्यबळ विकास खात्याचा स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात अर्थसाक्षरतेचे बिगूल फुंकले. अशा कार्यक्रमामुळे आपला देश अर्थसाक्षर होईल असे तुला वाटते काय? या प्रश्नाचे उत्तर तू दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’’ वेताळ म्हणाला.
‘‘नमोंनी कामकाज न झालेल्या हिवाळी अधिवेशनात खासदारांना संबोधित केले. या संबोधनादरम्यान नमोंनी सत्तारूढ पक्षाच्या खासदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन विरोधकांच्या बेगडय़ा विरोधाचे बिंग जनतेसमोर उघड करण्याचा आदेश दिला. त्यात राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांना नमोंबरोबर मंत्रिपदाची शपथ घेण्याचे भाग्य लाभले, व मंत्रिमंडळात दाखल झाल्यापासून स्वतंत्र खात्याचा कारभार सांभाळण्यास मिळाला. अडीच वर्षांत तीन वेळा खांदेपालट होऊनसुद्धा आधीच्या खात्यांपेक्षा चांगले खाते मिळाल्याने त्यांच्या पक्षात त्यांची ओळख नमोंचे ‘ब्ल्यू आईड बॉय’ अशी आहे. त्यातही मनुष्यबळ विकास खात्याची जबाबदारी वाजपेयी मंत्रिमंडळात मुरली मनोहर जोशींसारख्या जेष्ठांनी सांभाळलेली आहे. शिवाय गेल्या वर्ष-दीड वर्षांतील घटनाक्रम भाजपासाठी शिक्षण खाते किती महत्त्वाचे आहे याची पुरेपूर कल्पना देणारा आहे. जावडेकर जरी मध्य प्रदेशातून राज्यसभेचे सदस्य असले व त्यांचा मतदारसंघ तांत्रिकदृष्टय़ा मध्य प्रदेश असला तरी त्यांनी ही सभा घेण्यास पसंती पुण्याला देऊन होम पीचवर खेळणे पसंत केले,’’ राजा म्हणाला.
‘‘शिक्षण खाते मनुष्यबळ विकास खात्याचा एक भाग असल्याने सरांनी आपल्या या सभेसाठी निवड केली ती पुणेरी सदाशिव पेठेतील सपा महाविद्यलयाच्या प्रांगणाची. ही जागा त्यांच्या मंत्रालयाच्या प्रतिमेला साजेशीच होती. जावडेकर हे भाजपचे प्रवक्ते राहिले आहेत. इंग्रजीसहित मराठी, हिंदीवर उत्तम पगडा असलेल्या जावडेकरांना स्वयंप्रेरणेने बोलताना, ऐकताना मिळणारा आनंद वेगळा असतो. पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांचे बाउन्सर लीलया टोलविणारे जावडेकर त्या दिवशी संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण करताना ‘लाइन अॅण्ड लेंग्थ’ हरवलेल्या गोलंदाजासारखे वाटले. त्यांच्या एकूण भाषणाचा बाज संघ शिक्षा वर्गाचे बौद्धिक घेतल्यागत होता. ‘मला ई-वॉलेट वापरता येत नाही. महाविद्यालयीन विद्यार्थी ते सहजपणे वापरतात. त्यांच्याकडूनच मी ई-वॉलेट कसे वापरायचे ते शिकणार आहे,’ अशी कबुली देणारे जावडेकर आपल्या या भाषणाची ध्वनीचित्रफित फेसबुकवर पोस्ट करायला विसरले नाहीत.’’
‘‘तर सांगायचे असे की, या बौद्धिकातील अर्थसाक्षरता म्हणजे केवळ कॅशलेस व डिजिटल उलाढाली इतपतच मर्यादित राहिली. कार्यक्रमास पुण्यातील अभिजनांच्या उपस्थिती होती तर ठरल्याप्रमाणे सामान्य माणूस दूरच राहिला. सरांनी तरुणांना कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले त्याच वेळी डिजिटल व्यवहारांच्या संख्येत होत असलेल्या मोठय़ा वाढीचा उल्लेख केला. ही वाढ स्वयंस्फूर्तीने नाही तर लोकांच्या अगतिकतेमुळे आहे हे ते जाणत नसावेत असेही नाही. एकुणात भाजपच्या लेखी अर्थसाक्षरता ही केवळ कॅशलेस व डिजिटल व्यवहारांपुरती मर्यादित असली तरी अर्थसाक्षरतेला व्यापक रूप देणे आवश्यक आहे,’’ राजा म्हणाला.
पुढे राजा म्हणाला, ‘‘बहुसंख्य आर्थिक घोटाळे हे मोठय़ा व्याजाच्या लोभापायी झालेले आहेत. पॉन्झी योजना काय किंवा बुडालेल्या पतसंस्थांनी केलेले घोटाळेसुद्धा अधिक व्याजदाराच्या आमिषाला भुलून घडले आहेत. लोकांनी आपल्या सेवानिवृत्तीची पुंजी गमावल्याच्या कितीतरी घटना आहेत. चढय़ा व्याजदराने घेतलेल्या ठेवी परत करता येत नसल्याने एका विकासकाचा नजीकच्या काळात घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे. सध्या हा विकासक नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मुदतपूर्ती झालेल्या ठेवींची रक्कम देण्यासाठी मार्च-एप्रिल २०१७ मध्ये पैसे परत करण्याची आश्वासने देत आहे. या आश्वासनांची पूर्ती करण्यात हा विकासक कितपत यशस्वी होतो याचे उत्तर एप्रिल-मे दरम्यान मिळेल. पुढल्या बौद्धिकांमध्ये घसरत्या व्याजदरांना व वाढत्या महागाईला सामान्यांनी कसे तोंड द्यायचे याचा समावेश जावडेकर सरांनी नक्कीच करायला हवा. रिझव्र्ह बँकेचा रेपो दर ६.२५ टक्के असताना त्यापेक्षा दुप्पट व्याज दर देऊन स्वीकारलेल्या ठेवी किती सुरक्षित आहेत याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. आपल्या मुद्दलाची सुरक्षितता आपणच पाहायला हवी हे कळण्याइतपत ठेवीदार साक्षर होणे गरजेचे आहे. हे आजपर्यंत झाले नाही म्हणून सामान्यांच्या कष्टाचा पैसा पतसंस्था चालकांना पचविता आला. आपण कोणाला ठेवी देत आहोत; त्यांचा व्यवसाय काय; हा व्यवसाय आर्थिक आवर्तनामुळे किती बाधित होईल; पत निश्चिती कशी होते; एखाद्या रोख्याचे प्रगतिपुस्तक व सूक्ष्म अक्षरांतील तळटिपा का वाचणे आवश्यक आहे, या प्रश्नांचे निरूपण व्हायला हवे. साक्षरता अभियानात हे झाले नाही तर तो केवळ एक सरकारी उपचार ठरेल व अर्थसाक्षरतेपेक्षा पक्षीय कार्यक्रमाचे स्वरूप त्याला असेल. राज्यमंत्र्यांना या कार्यक्रमातून नक्की खात्याची जबाबदारी पार पाडायची आहे की त्यांच्या लेखी हा केवळ एक उपचार आहे हे या कार्यक्रमाच्या सूत्र निश्चितीवर ठरेल. ओंकारेश्वराच्या घाटावर घातलेले अर्थसाक्षरतेचे ते श्राद्ध न ठरावे इतकीच अपेक्षा.’’
अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.
पुंगीवाला gajrachipungi @gmail.com