महायुतीत भाजप-शिवसेनेचा जागावाटपाचा तिढा लवकर सुटत नाही. तिढा सुटल्यानंतर मित्रपक्षांचे जागावाटप होईल. कमी-अधिक जागांवरून वाद न करता आपण महायुतीसोबतच राहून सत्ताबदल घडवून दाखवू, असे रिपाइं अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी पत्रकार बैठकीत बोलताना सांगितले.
स्वभाव सोडून सबुरीची भाषा आपल्या तोंडी का आली? याला उत्तर देताना आठवले म्हणाले, की चळवळीतील स्वभाव राजकारणात चालत नाही, हे मला उमगले आहे. आजवर चळवळीच्या माध्यमातून अनेक विषयांवर राज्यात मोच्रे काढले, आंदोलने केली. मात्र, स्वबळावर सत्तेत येण्यासाठी पक्षाची बांधणी करता आली नाही. गावची पंचायत, नगरपालिकेत रिपाइं स्वबळावर निवडून येऊ शकते. मात्र, पंचायत समिती, जि.प. अथवा त्यापुढच्या जागा स्वबळावर निवडून आणता येत नाहीत याचीही आपणास जाणीव आहे. आम्ही इतरांना सत्तेवर बसवू शकतो, याची खात्री आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा राजकारणातील आपला अनुभव वाईट आहे. तिसरी आघाडीही करून पाहिली. त्यामुळे महायुतीत सबुरीने घेण्याचे ठरवले असल्याचे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत देशभर मोदींची हवा होती, मात्र चार राज्यांतील पोटनिवडणुकांच्या निकालावरून लोकसभेसारखे वातावरण राहिले नाही, हे दिसत आहे. त्यामुळे लोकसभेच्या विजयावर हुरळून न जाता विधानसभेची निवडणूक गांभीर्याने घ्यावी लागेल. सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवली की काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव अवघड नसल्याचे ते म्हणाले. रिपाइंसाठी २० जागा आपण मागितल्या आहेत. मात्र, १४ जागा मिळाल्या तरी समाधान मानू. जागांचे कारण काढून युती अडचणीत येईल असे आपण वागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी उद्या (गुरुवारी) नवी दिल्लीत आपली बठक ठरली असून, महाराष्ट्राबरोबरच देशात ज्या ठिकाणी रिपाइंची शक्ती आहे त्याचा उपयोग तेथील सरकार निवडून आणण्यासाठी करायची आपली तयारी आहे. त्या दृष्टीनेच आपली बोलणी राहणार असल्याचे आठवले म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणास मंत्रिपदाचा शब्द दिला असून विस्ताराच्या वेळी आपल्याला संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले. रिपाइंमध्ये गायक उदित नारायण लवकरच प्रवेश करणार असून, विविध क्षेत्रांतील मंडळींना रिपाइंत आणण्यास आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. रिपाइंचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत चिकटे, जिल्हाध्यक्ष देवीदास कांबळे उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा