बीडच्या आदित्य दंत महाविद्यालयाबाबत नेमलेल्या चौकशी समित्यांनी महाविद्यालय दोषी असल्याचे अहवाल दिले असून मान्यता रद्द करण्यात यावी, असा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने केंद्र शासनाकडे आणि डेंटल काऊन्सिल ऑफ इंडियाकडे सोमवारी पाठवला.
बीड येथील आदित्य दंत महाविद्यालयामध्ये असुविधा असल्याची आणि लैंगिक छळवणूक होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. या तक्रारींची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागाने त्याबाबत दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. महाविद्यालयातील असुविधांची चौकशी करण्यासाठी औरंगाबाद येथील डॉ. एस. आर. बारपांडे आणि लैंगिक छळवणुकीच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी लातूर येथील डॉ. दीप्ती डोणगावकर यांची चौकशी करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. या दोन्ही समित्यांना विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून त्यांनी महाविद्यालयाबाबत प्रतिकूल अहवाल दिला आहे. त्यानुसार या महाविद्यालयाची मान्यता काढून घेण्यात यावी असा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने केंद्र शासनाकडे आणि डेंटल काऊन्सिल ऑफ इंडियाकडे पाठवला आहे.
विद्यार्थिनींनी केलेल्या लैंगिक छळवणुकीच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे डॉ. डोणगावकर यांनी अहवालात म्हटले आहे.

Story img Loader