लोकसत्ता वार्ताहर

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील आजगाव, धाकोरे, मळेवाड या तीन गावांसह वेंगुर्ले तालुक्यातील आसोली सह पाच गावांतील लोह खनिज उत्खनन पुर्वेक्षणाला खनिकर्म विभागाने परवानगी दिली आहे. आठही गावातील ग्रामस्थांनी लोह खनिज प्रकल्पाला यापूर्वीच जोरदार विरोध केला आहे. दरम्यान हा विरोध हाणून पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे अशी चर्चा आहे. दरम्यान संघर्ष समिती स्थापन करून आंदोलने, न्यायालयीन लढाई देण्याची तयारी सुरू केली आहे असे मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांनी बोलताना सांगितले.

जे एस डब्ल्यू स्टील कंपनीने सावंतवाडी तालुक्यातील आजगाव, धाकोरे, मळेवाड आणि वेंगुर्ले तालुक्यातील आसोली, सखेलखोल, आरवली, सोन्सुरे, बांध या आठ गावांतील ८४०.०० हेक्टर क्षेत्रावर लोह खनिज उत्खनन पुर्वेक्षणाला खनिकर्म विभागाकडे परवानगी मागितली होती. ती प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी चैताली सावंत यांनी दिली आहे असे पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. जिल्ह्यातील प्रशासन, ग्रामपंचायत यांनाही दक्षता घ्यावी म्हणून खनिकर्म विभागाने कळविले आहे.

सावंतवाडी तालुक्यातील आजगाव, धाकोरे व मळेवाड या गावामध्ये व वेंगुर्ले तालुक्यात आसोली, सखेलखोल, आरवली, सोन्सुरे, बांध या गावांमध्ये लोह खनिजामाठी ८४०.०० हे. आर क्षेत्राकरिता Composite License मंजूर झालेले आहे, असे खनिकर्म अधिकारी चैताली सावंत यांनी म्हटले आहे.

प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी चैताली सावंत यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व सर्व संबंधित विभागांना पत्र पाठवून संबंधित कंपनी पुर्वेक्षण करणार असून सबंधित कंपनीस पुर्वेक्षण करणेकामी आपले स्तरावरून संबंधित अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनीधी यांना सहकार्य करणेबाबत सूचना देण्यात यावेत. तसेच पूर्वेक्षणाचे काम करत असताना सदर क्षेत्रातील जमीन मिळकतीचे कोणतेही नुकसान होणार नाही याबाबत संबंधित कंपनीस आपलेकडून ती निर्देश देण्यात यावे, तसेच पुर्वेक्षणाचे काम चालु असताना कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे म्हटले आहे.

सावंतवाडी तालुक्यातील तीन व वेंगुर्ले तालुक्यातील पाच मिळून आठही गावातील लोक शेती बागायती वर अवलंबून आहेत. या परिसरात जैवविविधता देखील आहे. आर्थिक दृष्ट्या सदन बनविणाऱ्या शेती बागायती व पर्यटन व्यवसायाला फटका बसणार आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी लोह खनिज उत्खनन पुर्वेक्षणाला विरोधात बैठका घेतल्या आहेत. आता प्रशासनाच्या नव्या आदेशानुसार आठही गावातील लोक काय भूमिका घेतात याकडे लक्ष वेधले आहे.आजगाव,धाकोरे, मळेवाड यांनी बैठकीत विरोध दर्शविला आहे आता प्रत्यक्षात काय भूमिका घेतात याकडे लक्ष वेधले आहे.

दरम्यान मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, शेती बागायती सह जैवविविधतेने समृद्ध भूमीत लोह खनिज उत्खनन प्रकल्प होऊ नये असे प्रत्येकाला वाटते त्यामुळे गावागावांत जनजागृती करून संघर्ष समिती स्थापन करण्यात येत आहे. शेती सोबतीला काजू, आंबा,नारळ, सुपारी, सुरंगी अशा विविधांगी फळबागा परिसरात आहेत. त्यामुळे गोरगरीब जनतेला याशिवाय पोट भरण्याचे दुसरे साधन नाही. त्यामुळे बोअर पुर्वेक्षणाला विरोध आहे. न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली आहे.आता राजकीय लोक, नेते यांनी जनतेसोबत राहावे. शेती बागायती वर वरवंटा फिरवला जाणार नाही अशी खबरदारी घ्यावी असे हेमंत मराठे यांनी आवाहन केले.