सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे व योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी १ हजार ५९४ कोटी रुपयांना मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे योजनेसाठी लागणाऱ्या दरवर्षी सुमारे ३९८ दशलक्ष युनीट वीजेची गरज भागवली जाणार आहे. म्हैसाळ सिंचन योजनेचा उद्भव कृष्णा नदीवर म्हैसाळ येथे आहे. येथून विविध टप्प्यांमध्ये २३.४४ अब्ज घनफूट पाणी उचलून त्याद्वारे सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठे महांकाळ, तासगांव, जत व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्रास सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

योजनेचा वीज वापराचा खर्च कमी करणे व हरित उर्जा निर्मितीसाठी कायमस्वरुपी उपाय योजना म्हणून हा ऊर्जा कार्यक्षम जलव्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या करिता केएफडब्ल्यु जर्मन बँकेकडून १३० मिलियन युरो (अंदाजे १ हजार १२० कोटी) कर्ज स्वरूपात व ४७४ कोटी राज्य शासनाची गुंतवणूक अशा एकूण १ हजार ५९४ कोटी किंमतीच्या प्रकल्पासाठी त्रिपक्षीय करार करण्यास मान्यता दिली आहे.

या ऊर्जा कार्यक्षम जलव्यवस्थापनात म्हैसाळ योजनेतील एकूण १०८ पंपांपैकी ६५ पंप नवीन ऊर्जा कार्यक्षम पंप पद्धतीचे असतील. तसेच यात एपीएफसी व एससीएडीए- स्काडा यंत्रणा बसवणे व २०० मे.वॅ. क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करणे, तयार झालेली वीज स्वतंत्र विद्युत वाहिनी द्वारे २२०/३३ के. व्ही नरवाड उपकेंद्रापर्यंत पुरवणे या कामांचा समावेश आहे.

जर्मन बँकेच्या मदतीने प्रकल्प

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केएफडब्ल्यू जर्मन बँकेकडून १३ कोटी युरो म्हणजे अंदाजे १ हजार १२० कोटी रुपये कर्ज स्वरुपात व ४७४ कोटी राज्य सरकारची गुंतवणूक, असा एकूण १ हजार ५९४ कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पासाठी त्रिपक्षीय करार करण्यासाठीही राज्य सरकारने मान्यता दिली आहे. सुमारे २०० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करून तयार झालेली वीज स्वतंत्र विद्युत वाहिनीद्वारे नरवाड येथील उपकेंद्रापर्यंत पुरविली जाणार आहे. योजनेतील एकूण १०८ पंपांपैकी ६५ पंप नवीन ऊर्जा कार्यक्षम पंप असतील. तसेच एपीएफसी व एससीएडीए – स्काडा यंत्रणाही बसविण्यात येणार आहे. मुख्य अभियंता (विद्युत) यांच्याकडे प्रकल्पाची अंमलबजावणी व समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दरवर्षी सुमारे २५ कोटींचे वीजबिल

कृष्णा नदीचे पाणी मिरज शहराजवळील म्हैसाळ येथून उचलून एकूण सहा टप्प्यांमध्ये कार्यन्वित आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढ्यापर्यंत जाते. विविध ठिकाणी एकूण सहा वेळा पाण्याचा उपसा करावा लागतो. त्यामुळे म्हैसाळ योजनेला दरवर्षी सुमारे २५ कोटी रुपयांचे (३९८ दशलक्ष युनीट वीज वापर ) वीजबिल येते. या वीजबिलाची वसुली पाणीपट्टीद्वारे होत नाही. त्यामुळे वीजबिल भरले नाही म्हणून योजना बंद पडण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे दुष्काळी निधी किंवा टंचाई निधीतून वीजबिल भरून योजना सुरू ठेवली जात होती. हा वीजबिलाचा वाढता खर्च भागविण्यासाठीच सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव पुढे आला आहे.