जनतेशी केलेला विश्वासघात आणि भ्रष्टाचार यामुळेच काँग्रेसला जनतेने मतदानातून शिक्षा दिली असून याचा परिणाम लोकसभेच्या येत्या निवडणुकीतही होईल, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ‘आम आदमी पार्टी’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची मुक्तकंठाने स्तुती करून अरविंद एक ना एक दिवस मुख्यमंत्री होईल असा विश्वासही हजारे यांनी व्यक्त केला.
 सुमारे ५० वर्षांपासून देशावर काँग्रेसची सत्ता आहे. मात्र त्यांनी जाणीवपूर्वक जनतेच्या हिताचे कायदे केले नाहीत. भ्रष्टाचारामुळेच काँग्रेसचा पराभव झाला असून, जनलोकपाल विधेयकाबाबत आश्वासन देऊनही जनतेचा विश्वासघातच केला, हा रागदेखील जनतेच्या मनात होता. त्यामुळेच मतदानाच्या माध्यमातून जनतेनेच काँग्रेसला शिक्षा दिल्याचे सांगत हजारे म्हणाले, देशभरात काँग्रेसविरोधी लाट आहे. काँग्रेसने अजूनही चुकांमध्ये सुधारणा केली नाहीतर येत्या लोकसभा निवडणुकीतही जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

Story img Loader