ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. बंडखोरी करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘वर्षा’ निवासस्थानी येऊन रडले होते, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला. शिवाय मी भाजपाबरोबर गेलो नाही, तर ते मला तुरुंगात टाकतील, अशी भीतीही एकनाथ शिंदेंनी व्यक्ती केली होती, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंच्या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून भाजपासह शिंदे गटाच्या नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्र सोडलं. “एकनाथ शिंदे हे रडणारे नाहीत, तर लढणारे नेते आहेत. त्याची प्रचिती महाराष्ट्राने अनुभवली आहे,” असं प्रत्युत्तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं.
हेही वाचा- लग्न कधी करणार? मुलगी कशी हवीय? आदित्य ठाकरेंनी खळखळून हसत दिलं उत्तर, म्हणाले…
राधाकृष्ण विखे पाटलांच्या टीकेला आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी अरविंद सावंतांनी राधाकृष्ण विखे पाटलांची तुलना थेट सरड्याशी केली आहे. एकनाथ शिंदे रडणारे नाहीत, तर लढणारे नेते आहेत, या विखे पाटलांच्या विधानाबद्दल विचारलं असता अरविंद सावंत म्हणाले, “राधाकृष्ण विखे-पाटील म्हणजे रोज रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे आहेत. आज या पक्षातून उद्या त्या पक्षात उड्या मारतात. शिवसेनेतही होते. कोणता पक्ष शिल्लक राहिल का विचारा?”
राधाकृष्ण विखे पाटील नेमकं काय म्हणाले होते?
“आदित्य ठाकरेंचा पोरखेळ संपलेला दिसत नाही. सत्ता गेल्यावर त्यांना शहाणपण येईल, असे वाटत होतं. एकनाथ शिंदे हे रडणारे नाहीत, तर लढणारे नेते आहेत. त्याची प्रचिती महाराष्ट्राने अनुभवली आहे. सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरे एवढे वैफल्यग्रस्त झालेत की, त्यांना रडू आवरत नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंचा ‘पप्पू’ होऊ नये, एवढी काळजी त्यांनी घेतली पाहिजे,” असं विखे-पाटील यांनी म्हटलं होतं.