निवडणूक आयोगानं ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव एकनाथ शिंदे गटाला दिलं आहे. तर ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव उद्धव ठाकरे यांच्या गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगानं निवडणूक चिन्हाबाबतही निर्णय घेतला असून ‘मशाल’ हे चिन्ह ठाकरे गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या राज्यात चोरबाजार सुरू असल्याचं विधान त्यांनी केलं आहे. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
पक्षाचं नवीन नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत विचारलं असता अरविंद सावंत म्हणाले की, ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आम्हाला मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. कारण आमच्या पक्षाला नवीन चेहरा मिळाला आहे. आम्हाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. त्यामुळे आता आम्हाला मास्क लावावा लागणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या नावात ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशी तिन्ही नावं आहेत.
हेही वाचा- उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का? निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या चिन्हांबाबत संजय शिरसाटांचं मोठं विधान!
‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह मिळाल्याचाही आम्हाला आनंद आहे. त्रिशूळ आणि उगवता सूर्य असे अन्य दोन पर्याय आम्ही दिले होते. या तीन पर्यायांमधील एक पर्याय निवडणूक आयोगानं स्वीकारला आहे. ‘मशाल’ हे आमचं केव्हातरी चिन्ह होतं. सध्या हा चोरबाजार सुरू आहे, बापाला चोरा, पक्षाला चोरा, पक्षाचं चिन्ह चोरा असा प्रकार सुरू आहे. या चोरबाजाराला काही ग्रेट महाशक्तीचं सहकार्य मिळत आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही सादर केलेली माहिती ताबोडतोब लीक कशी होते? त्यानंतर शिंदे गटाकडूनही त्याच प्रकारची चिन्हं कशी काय देण्यात आली? असा सवाल अरविंद सावंत यांनी विचारला आहे.
हेही वाचा- मोठी बातमी! शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळालं
आम्हाला निवडणूक चिन्ह म्हणून क्रांती ज्योत मिळाली आहे. मशाल हे चिन्ह आमच्यासाठी नवखं नाही. जेव्हा आमच्याकडे कोणतीच निशाणी नव्हती, तेव्हा मशाल आणि ढाल तलवार ही आमची निशाणी असायची. १९८९ नंतर धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळालं. बाळासाहेब ठाकरे दररोज ‘धनुष्यबाण’ चिन्हाची पूजा करायचे. ते धनुष्यबाण चिन्हाशी एवढं भावनिक एकरूप झाले होते, म्हणून त्याचं सर्वाधिक दु:ख होतंय. शेवटी माणसं जास्त महत्त्वाची आहेत, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे.