महाराष्ट्रात मागील काही दिवसांमध्ये विविध मुद्य्यांवरून मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. यामध्ये प्रामुख्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा मुद्दा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उचलून धरण्यात आला असून, भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदेवर जोरदार टीका सुरू आहे. याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तत्काळ हटवलं जावं, अशीही जोरदार मागणी सुरू आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत घेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यपाल कोश्यारींवर निशाणा साधल्याचे दिसून आले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. साधारणता एक प्रघात आहे की, ज्याचं सरकार केंद्रात असतं, त्यांचीच माणसं किंवा त्यांच्याच विचारसरणीची माणसं देशातील विविध राज्यात किंवा सगळ्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून पाठवली जातात. या माणसांची कुवत काय असते, या माणसांची पात्रता काय असते? जरासा एक शब्द वापरतोय कुणी गैरसमज करू नये, म्हणजे खास करून ज्येष्ठ नागरिकांबद्दल मी बोलतो आहे. ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? हा सुद्धा एक प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे आणि राज्यपाल नियुक्तीचे निकष सुद्धा ठरवायला पाहिजेत, असं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे. ”
याशिवाय “राज्यपाल हे आपल्या महामहीम राष्ट्रपतींचे दूत असतात, राष्ट्रपती हे निपक्ष असायला पाहिजेत ते असतात आणि त्याचप्रमाणे राज्यपाल सुद्धा हे निपक्ष असायला पाहिजेत. राज्यात जर काही पेचप्रसंग उभा राहिला. तर त्याची सोडवणूक राष्ट्रपती किंवा केंद्र सरकारच्या मध्यस्थीने करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असली पाहिजे, असा आपला एक समज आहे. ” असंही ठाकरे म्हणाले.
याचबरोबर, “मात्र ज्याचं सरकार केंद्रात असतं. त्यांच्याच विचारसरणीची माणसं ही राज्यात राज्यपाल म्हणून पाठवल्यानंतर, राज्यपाल जे काही बोलतात ते मला असं वाटतं गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण, आपले राज्यपाल तुम्हाला माहीत आहेत. त्यांना राज्यपाल म्हणणं मी सोडून दिलं आहे. कारण, राज्यपाल पदाचा मी नेहमी मान, बहुमान करत आलो आहे आणि यापुढेही करेन. पण कोणीही व्यक्ती केवळ राज्यपाल पदाची झूल त्यांच्यावर पांघरली, म्हणजे लगेच त्यांनी वेडवाकडं काहीही बोलावं हे मात्र मी आणि आमचा महाराष्ट्र मान्य करेल असं मला वाटत नाही. ” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली.