भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा मागील काही काळापासून पक्षातील काही नेत्यांशी अंतर्गत कलह सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. पक्षातील अंतर्गत कलहामुळे त्या नाराज असून त्यांचं पक्षात खच्चीकरण केलं जात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे त्या लवकरच आपल्या पक्षाला रामराम ठोकतील, असे तर्क-वितर्क लावले जात होते. या सर्व चर्चांना पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे. आपण पक्षात नाराज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

याबाबत विचारलं असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मला सर्व चर्चाच व्यर्थ वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सर्व मंत्रिमंडळातील नेत्यांचे चेहरे एका रांगेत लावा, त्यात माझाही फोटो लावा. माझ्या चेहऱ्यात काही कमी फ्रेशनेस आहे का? मी अत्यंत फ्रेश आहे. नाराज असण्याचं काही कारणच नाही? मी रुसणे किंवा नाराज होणे, या फार वैयक्तिक गोष्टी आहेत. त्या सार्वजनिक आयुष्यात किंवा राजकीय आयुष्यात पुढे आणायच्या नसतात, या विचारात मी वाढलेली आहे, असं स्पष्ट विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यांनी नुकतीच ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे.

हेही वाचा- “…तोपर्यंत मी जगात कुणालाही घाबरत नाही” धनंजय मुंडेंची जोरदार डायलॉगबाजी!

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाल्यास त्यांना कोणते प्रश्न विचाराल असं विचारलं असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, “देवेंद्र फडणवीस हे सध्या उपमुख्यमंत्री झाले आहेत. पुढच्या निवडणुकीपर्यंत त्यांची काय रणनीती किंवा योजना आहे? असा प्रश्न विचारेल. तसेच सध्या त्यांच्याकडे गृह आणि वित्त असे प्रचंड महत्त्वाचे विभाग आहेत. राज्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी कोणते प्रयत्न करणार आहात? महिला सुरक्षेसाठी काय करणार आहात? वित्त विभागाचं नियोजन करून अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी काय योजना असेल? असे प्रश्न त्यांना विचारले असते, असं उत्तर पंकजा मुंडे यांनी दिलं आहे.

हेही वाचा- एकनाथ खडसेंचा निर्णय चुकला? राष्ट्रवादीत प्रवेश करण्यावरून पंकजा मुंडेंचं मोठं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी त्यांनी विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, सुषमा स्वराज यांचीही मुलाखत घ्यायला आवडली असती, असंही त्यांनी म्हटलं आहे. हे नेते दिलखुलास होते. सध्याचं राजकारण तसं नाहीये. विचारलेल्या प्रश्नाला ते खरं उत्तर देतील, याबाबत शंका आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.