सहकारी तत्त्वावर उभारलेला महाराष्ट्रातील कोयना सहकारी दूध संघ आता प्रगत तंत्रज्ञानाने परिपूर्ण झाला असून, तब्बल शंभर कोटी रुपयांच्या उलाढालीच्या उंबरठय़ावर आहे. गत आर्थिक वर्षांत दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी प्रती लिटर ३५ पैसे तर, म्हशीच्या दुधासाठी प्रती लिटर ४५ पैसे याप्रमाणे सुमारे ५२ लाख रुपयांचा फरक देणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष संपतराव इंगवले व सरव्यवस्थापक अमोल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इंगवले म्हणाले, की सन १९५७ मध्ये आर. डी. पाटील यांनी हा सहकारातील पहिला दूध संघ स्थापना केला. पुढे आमदार विलासराव पाटील -उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोयना दूध संघाची उत्तरोत्तर प्रगती होत गेली आहे. गत आर्थिक वर्षांत सुमारे ९५ कोटी रुपयांची उलाढाल होताना, १ कोटी ३४ लाख रुपयांचा व्यापारी नफा झाला आहे. संघाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून स्थानिक सहकारी संस्थांना शंभर टक्के अनुदानाची दिलेली संधी संघाने सार्थ ठरवली आहे. या अंतर्गत संगणक संयंत्र मोफत वाटप करण्यात आली असून, कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी बसवलेल्या बल्क कुलर्समुळे संघाकडे चांगल्या गुणप्रतीचे दूध संकलन होत असून, ग्राहकांनाही चांगल्या दर्जाचे दूध उपलब्ध होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. दूध गुणप्रत तपासणीसाठी मिल्कोटेस्टर, अनुदानावर कडबाकुट्टी मशिन, अॅसीड, अल्कोहोल मोफत पुरवठा, लाळ खुरकत, घटसर्प, फऱ्या, रोगाचे लसीकरण, सामूहिक जंतनिर्मूलन कार्यक्रम, चारा बियाणांचा पुरवठा, मिनरल मिक्चर व पशुखाद्याचा माफक दरात पुरवठा अनुदानावर हॅण्ड चाफ कटर, दूध उत्पादकांसाठी अभ्यास दौरे, मार्गदर्शन शिबिरे, नियमित अनुदानित कृत्रिम रेतन सेवेबरोबरच अत्याधुनिक कॅनडाचे कृत्रिम रेतन मात्रा व पंढरपुरी म्हैस रेतना मात्रा अनुदानावरून उपलब्ध केले आहे. इतर  सुविधाही नियमितपणे देण्यात येत आहेत. संघाने किमान ५ जनावरांच्या मुक्त गोठा पध्दतीमध्ये प्रती जनावर ५०० रुपये अनुदान, प्रत्येक वाफ्याला २५० रुपये, चारा पिकांसाठी ५० टक्के अनुदान योजना सुरू केली आहे. संघाच्या विविध सेवा सुविधांचा व विशेष योजनांचा लाभ घेऊन आपले दूध उत्पादन आपली आर्थिक प्रगती साधण्याचे आवाहन इंगवले यांनी केले.

Story img Loader