राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेत चर्चा केली. त्यापूर्वी भास्कर जाधव हे आपल्या कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांसह बारसूकडे जात असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. तेव्हा भास्कर जाधव आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘रस्ता काय तुमच्या मालकीचा आहे का?’, असा संतप्त संवाल भास्कर जाधव यांनी पोलिसांना विचारला.

नेमकं काय घडलं?

बारसूच्या आंदोलनस्थळी जात असताना गाडी अडवल्यानंतर भास्कर जाधव आणि पोलिसांमध्ये वाद झाला. “गाडी अडवण्याचं कारण काय? कोणत्याही कारणाशिवाय गाडी का अडवत आहात? कारण नाही अशी भाषा वापरायची नाही,” अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी खडेबोल सुनावले.

हेही वाचा : आठ दिवसांपूर्वी प्रकल्पांचं समर्थन करणाऱ्या राजन साळवींची भूमिका का बदलली? उद्धव ठाकरे म्हणाले…

परवानगी घेऊन या असे पोलिसांनी सांगितल्यावर भास्कर जाधव म्हणाले, “कोणाची परवानगी आणायची आहे? तुम्हाला पोलीस अधिक्षकांनी काय परवानगी दिली आहे. किंवा काय लिहून दिलं आहे, जरा पाहू. तुमची नेमणूक केली असल्याने, तुम्हाला बोलतोय. नाहीतर बोलण्याची गरज काय होती?.”

“घमेंडी आणि दादागिरीत बोलायचं नाही. सौजन्याने बोला. तुम्ही कोणाशी बोलताय… अंगावर कपडे घातले म्हणून वाटेल, तसे वागायचं नाही. रस्ता काय तुमच्या मालकीचा आहे काय?,” असा सवाल भास्कर जाधव यांनी पोलिसांना विचारला.

हेही वाचा : “शिंदे-फडणवीस सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत त्यामुळे…” बारसूमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

तेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी एवढा पोलीस बंदोबस्त कशासाठी लावण्यात आला? असा प्रश्न विचारल्यावर भास्कर जाधवांनी सांगितलं, “पोलिसांना दुसरं काम काय आहे. असले उद्योग करण्यासाठी पोलीस असतात. पोलीस चांगलं काम कधी करतात. त्यांना मिळालेल्या सूचनेनुसार ते वागतात. पण, कधी-कधी अती करतात. पोलिसांना प्रत्येक क्षेत्रात अमर्याद अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे ते बोलतील तो कायदा आणि नियम… पोलिसांच्या अंगावर वर्दी चढली की नशा चढते,” अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Argument between ratnagiri police and shivsena mla bhaskar jadhav in barsu over stop car ssa