सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचा शुभेच्छा फलक लावण्यावरून सोलापूरनजीक वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे दोन गटांत वाद उफाळून आला. यातून राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाच्या पुत्र व नातवासह दोन्ही गटांच्या आठजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वडाळा गावात त्यांच्या समर्थकांनी शुभेच्छा फलक उभारला होता. परंतु याच गावात राहणारे शरद पवारप्रणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांचे नातू जयदीप जितेंद्र साठे यांनी आक्षेप घेतला. गावात अवताडे आणि नागणे हा गट काँग्रेसचा मानला जातो. या गटाकडून शिंदे यांचा शुभेच्छा फलक उभारला असता त्यात साठे गटाने अडवणूक केली. यावरून मोठा वाद झाला. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
हेही वाचा – साताऱ्यासह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळून जालना येथील घटनेचा निषेध
हेही वाचा – दुर्धर आजाराच्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या ‘पॅलेटिव्ह केअर’ची अंमलबजावणी कूर्मगतीने!
या प्रकरणात स्वतः राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी आपले चिरंजीव तसेच इतर कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. वडाळ्याचे सरपंच जितेंद्र साठे यांच्यासह चिरंजीव जयदीप साठे, दिनेश साठे, अनिल साठे तसेच विरोधी गटातील अभिमान नागणे, समीर नागणे, विकास आवताडे, मयूर आवताडे अशा आठजणांविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.