ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय) वतीने ९ ते १२ जानेवारी या कालावधीत ‘सिंपोसियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी’ ही परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेत वाहन क्षेत्रातील जगभरातील तंत्रज्ञ, संशोधक सहभागी होणार असून, सुरक्षित व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पर्यावरणपूरक वाहननिर्मितीवर या परिषदेत चर्चा होणार आहे.
‘एआरएआय’चे संचालक व परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत मराठे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. परिषदेचे उद्घाटन ९ जानेवारीला अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते होणार आहे. सुरक्षितता, शांतता, स्वच्छता म्हणजेच प्रवाशाची सुरक्षा तसेच पर्यावरणपूरक अत्याधुनिक वाहननिर्मिती ही यंदाच्या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. वाहन उद्योगाला सध्या सुरक्षितता, वायूचे उत्सर्जन या क्षेत्रातील आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. त्या पाश्र्वभूमीवर यंदाच्या परिषदेची संकल्पना सुसंगत व महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन पर्यावरणपूरक वाहनांच्या निर्मितीसाठी कल्पक व आधुनिक तंत्रज्ञानावर यंदाच्या परिषदेचा भर राहणार आहे. याशिवाय इंजिन, पर्यायी इंधन, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन अभियांत्रिकी, कच्चा माल आदी विषयांवरही परिषदेत प्रकाश टाकला जणार आहे.
वाहन क्षेत्रातील तंत्रज्ञानासंबंधी विविध विषयांवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना आपले विचार मांडण्यासाठी ही परिषद व्यासपीठ ठरणार आहे. परिषदेबरोबरच ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी व वाहन क्षेत्रातील सेवांबाबत प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात दोनशेहून अधिक स्टॉल असणार आहेत. माहितीची देवाण-घेवाण होण्याबरोबरच व्यवसायाची संधीही या ठिकाणी मिळू शकणार आहे. या विषयात आवड असणाऱ्या नागरिकांना हे प्रदर्शन खुले असणार आहे, अशी माहिती मराठे यांनी दिली.
‘एआरएआय’च्या नव्या प्रकल्पांविषयीही मराठे यांनी माहिती दिली. चाकण येथील प्रकल्पाचा विस्तार करण्यात येणार असून, त्या ठिकाणी विविध विषयांच्या प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे केसुर्डी (शिरवळ) येथेही विस्तारित प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

Story img Loader