शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे १५ आमदारांच्या गटासह काँग्रेसमध्ये जाणार होते, असा दावा खैरेंनी केला आहे. खैरेंच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, चंद्रकांत खैरेंच्या या विधानानंतर शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठीच हे विधान कलेले असावे, असे अर्जुन खोतकर म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’ने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे.
हेही वाचा >>> “एकनाथ शिंदे १५ आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, पण…”, अशोक चव्हाणांनंतर चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा
चंद्रकांत खैरे हे ज्येष्ठ नेते आहेत. मागील ४० वर्षांपासून आम्ही सोबत काम करतो. खैरे कोणत्या आधारावर बोलले याची मला कल्पना नाही. खैरे काय बोलले हे ऐकल्यानंतरच त्यावर बोलणे उचित राहील. मात्र एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सर्व स्तरातून होत आहे. त्याचा हा भाग असू शकतो. एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. ही लोकप्रियता वाढू नये म्हणूनच हे विधान केलेले असावे, असे अर्जुन खोतकर म्हणाले.
चंद्रकांत खैरे काय म्हणाले होते?
“फडणवीस सरकारच्या काळातच एकनाथ शिंदेंसह काही नेते अशोक चव्हाण यांच्याकडे सत्तास्थापनेचा प्रस्ताव घेऊन गेले होते. एवढंच नाही तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा एकनाथ शिंदे आम्हाला काँग्रेसमध्ये यायचं आहे असं म्हणत मागे लागले होते. यावेळी काही लोकही उपस्थित होते. यासाठी त्यांनी खूप पाठपुरावा केला, पण ते शक्य झालं नाही,” असे चंद्रकांत खैरे म्हणाले.