“ज्या कपटी लोकांनी तुम्हा-आम्हाला छळलं, त्रास दिला त्यांचा निवडणुकीत सत्यानाश झाला”, असं वक्तव्य शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते आणि माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी केलं आहे. खोतकर यांनी कोणत्याही व्यक्तीचं अथवा नेत्याचं नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख त्यांचे जालन्यातील राजकीय प्रतिस्पर्धी रावसाहेब दानवे यांच्याकडे होता असं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात शिवसेनेच्या शिंदे गटाची एक आढावा बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदे गट जालन्यात तयारी करत आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला संबोधित करताना अर्जुन खोतकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच या वक्तव्यामुळे जालन्यातील शिवसेना भाजपातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याची चर्चा आहे.
शिवसेना आणि भाजपाची तीन दशकांहून अधिक काळापासून युती असली तर जालन्यात दोन्ही पक्षांमध्ये अधून मधून संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. या दोघांमधील वाद मिटून दोन्ही नेत्यांनी युतीसाठी एकत्र राहून काम करावं यासाठी अनेकदा दोन्ही पक्षांमधील वरिष्ठांना मध्यस्थी करावी लागली आहे. दरम्यान, खोतकर यांनी नुकतीच नाव न घेता एका नेत्यावर टीका केली आहे. त्यामुळे खोतकरांचा रोख रावसाहेब दानवेंकडेच होता असं बोललं जात आहे.
पक्षाच्या आढावा बैठकीत अर्जुन खोतकर म्हणाले, “ज्या कपटी लोकांनी तुम्हा आम्हाला छळलं, ज्यांनी तुम्हा-आम्हाला फार त्रास दिला, त्यांचा निवडणुकीत सत्यानाश झाला. मात्र आता त्यांच्यापासून सावध राहायची आवश्यकता आहे. त्यांच्यापासून सावधपणे पावलं टाकण्याची वेळ आली आहे.” नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे. खोतकरांनी त्याच घटनेचा उल्लेख करत हे वक्तव्य केलं असावं, असं बोललं जात आहे.
हे ही वाचा >> पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीचे (भाजपा) उमेदवार रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे. सलग पाच वेळा जालन्याचे खासदार राहिलेले दानवे यंदा विजयी षटकार ठोकू शकले नाहीत. काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे (महाविकास आघाडी) यांनी जालन्यात रावसाहेब दानवे यांचा तब्बल १ लाख १० हजार मतांनी पराभव केला आहे. कल्याण काळे यांना या निवडणुकीत ६ लाख ७ हजार मतं मिळाली तर दानवे यांना ४ लाख ९७ हजार मतांवर समाधान मानावं लागलं.