Arjun Khotkar Suggestion To women for Govt Schemes : “योजनांच्या लाभांसाठी सासू व सुनेने कागदोपत्री वेगळं व्हावं”, असा अजब सल्ला शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते व माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी दिला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच मोफत गॅस सिलिंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना खोतकर यांनी हा सल्ला दिला आहे. खोतकर म्हणाले, एका कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर देण्याची सरकारची योजना आहे. मात्र तुम्ही महिलांनी थोडी चालाखी दाखवावी आणि सासू-सुनांनी कागदोपत्री वेगळं व्हावं, असे केल्यास तुम्हाला जास्त सिलिंडर मिळतील.
अर्जुन खोतकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी निर्णयांचा व योजनांचा धडाका लावला आहे. अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मोफत गॅस सिलिंडर योजना सादर केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये मिळणार आहेत. तसेच तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत. या योजना घरातील केवळ दोन महिलांना लागू होणार होत्या. मात्र आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हणालो, एका घरात एक सासू व दोन सुना असतील तर त्यांच्यात भांडणं लागतील. त्यामुळे तुम्ही असं करू नका. जेवढ्या महिला आहेत तेवढ्या सगळ्यांना या योजना देऊन टाका. एखाद्या घरात तीन सुना व एक सासू असली तरी त्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.
शिंदे गटाचे नेते म्हणाले, तुम्ही आता मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झालेल्या आहात. म्हणून आता तुम्ही घरातील मंडळींकडे दुर्लक्ष करू नका. नाहीतर घरी जाऊन नवऱ्याला म्हणाल, मी आता मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे, मी आता कोणाला घाबरत नाही, असं काही करू नका.
हे ही वाचा >> मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत तुमची भूमिका काय? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले…
काय म्हणाले अर्जुन खोतकर?
खोतकर सर्व महिलांना म्हणाले, तुम्ही महिलांनी थोडी हुशारी दाखवायला हवी. एका कुटुंबासाठी सरकारने तीन गॅस सिलिंडर घोषित केले आहेत. मात्र तुम्ही माझं ऐका. थोडी चालाखी दाखवा. सासू व सुना वेगळ्या झाल्यात असं दाखवा. तुम्ही वेगळ्या राहू नका. परंतु, कागदोपत्री वेगळ्या व्हा. सासू-सुना वेगळ्या झाल्या तर तुम्हाला जास्त गॅस सिलिंडर मिळतील. एका घरात तीन सुना आणि एक सासू असेल तर प्रत्येकीला तीन या हिशोबाने एका घरात १२ सिलिंडर मिळतील. तसेच प्रत्येक महिलेला १५०० रुपये मिळणार आहेत.