पुणे व सातारा जिल्ह्यातील पोलिसांनी काल दुपारी कराडजवळील शामगाव घाटात मोठय़ा शिताफीने पकडलेल्या पाचजणांच्या सशस्त्र टोळीकडून मोठय़ा प्रमाणात गुन्हय़ांची उकल होईल, असा विश्वास या गुन्ह्याचे तपासी अधिकारी व वडगाव निंबळक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. अटकेत असलेल्या पाचही जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली असल्याचे भोसले म्हणाले. या टोळीकडील कार चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, सर्वत्या शक्यता व शंकांच्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे. सध्या हे पाचही तरुण वडगाव-निंबळक पोलिसांच्या ताब्यात आहेत.
बारामती तालुक्यात ठिकठिकाणी चोऱ्या करून पोबारा करणाऱ्या पाचजणांच्या टोळीला पोलिसांनी शामगाव घाटात थरारक पाठलाग करून गजाआड केले. त्यात पोलिसांना या टोळीच्या वाहनावर गोळीबार करावा लागला. सदर कारवाईत या तरुणांकडून सुमारे सहा लाखांचा ऐवज व शस्त्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय कल्याण तावरे (वय २२), सुभाष सुखदेव मदने (वय १९), सागर किसन काळभोर (वय २१ तिघेही रा. सांगवी, ता. बारामती), प्रवीण ऊर्फ बंटी मोहन काकडे (वय ३१, रा. झिपरवाडी, ता. फलटण) व सचिन हणमंत चव्हाण (वय १९, रा. कुरवली, ता. फलटण) अशी ही पाचजणांची टोळी गजाआड करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तलवार, सत्तूर, चॉपर, चाकू अशी शस्त्रे जप्त केली आहेत. अंगठी, कर्णफुले अशा सोन्यांच्या दागिन्यांसह एक लाखाच्या रकमेसह ५ लाख ९६ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. या टोळीने वडगाव निंबाळकर, करडोली, नीरा, बारामती, पुणे या भागात दरोडे घातल्याची पोलिसांनी खात्री व्यक्त केली आहे. ही टोळी कराडकडे जात असल्याचे लोकेशन मिळाले. त्यावेळी बारामती व मसूर पोलिसांनी शामगाव घाटात सापळा रचला. दुपारी बाराच्या सुमारास चोरटय़ांची गाडी शामगाव घाटात आली. पहिल्या पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यांना हुलकावणी देऊन कार पुढे निघून गेली. बारामतीचे फौजदार अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने गाडीचा पाठलाग सुरू केला. तर, दुसऱ्या पथकाने गाडी थांबण्यास सुनावले. मात्र, या टोळक्याने पोलिसांच्या इशाऱ्यांना आव्हान देत, गाडी पळवण्याचा घाट घातला. यावर पाठलाग करणारे पोलीस अधिकारी संदीप कदम यांनी टोळीच्या गाडीच्या दिशेने गोळी झाडली. गोळी टायरला लागल्याने एका वळणावर ही गाडी थबकली. त्यावेळी समोरून व मागून दोन्ही पथके तेथे पोचली. गाडीतून पळून जाणाऱ्या पाचजणांना पाठलाग करून पकडले.
कराडजवळ सशस्त्र टोळीस अटक
पुणे व सातारा जिल्ह्यातील पोलिसांनी काल दुपारी कराडजवळील शामगाव घाटात मोठय़ा शिताफीने पकडलेल्या पाचजणांच्या सशस्त्र टोळीकडून मोठय़ा प्रमाणात गुन्हय़ांची उकल होईल, असा विश्वास या गुन्ह्याचे तपासी अधिकारी व वडगाव निंबळक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी लोकसत्ताशी बोलताना …
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 16-03-2014 at 02:56 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Armed gang arrest karad