सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी गावात गोहत्या केल्याच्या कारणावरून दोघा तरुणांवर जमावाकडून सशस्त्र हल्ला करण्यात आला. यात दोघेही तरुण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी १६ हल्लेखोरांविरुद्ध तसेच गोहत्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या ३ जुलै रोजी सकाळी सशस्त्र हल्ल्याचा प्रकार घडला तेव्हा त्याचे व्हिडीओ चित्रण करून समाजमाध्यमांवर प्रसारीत झाली. त्यातून हा प्रकार उजेडात आला.
गुडूलाल मशाक शेख (वय ३९) व सिराज नजीर अहमद शेख (वय ३२) अशी जखमींची नावे आहेत. हे दोघे आपल्या शेतात थांबले असताना गावातील तरुणांचा जमाव तेथे आला. या जमावाने गोहत्या केल्याच्या कारणावरून गुडूलाल व सिराज यांना जाब विचारत त्यांच्यावर लोखंडी सळई आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला केला. यात दोघे गंभीर जखमी होऊन निपचित पडल्यानंतर जमाव निघून गेला. जखमींवर सोलापुरात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – अजित पवारांच्या शपथविधीच्या दिवशी नेमकं काय झालं? आमदार सरोज अहिरेंनी सांगितला घटनाक्रम
याप्रकरणी जखमी गुडूलाल याने वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संगमेश्वर महादेव बम्मणगे, उमेश बम्मणगे, पंचनाथ चंद्रकांत दिंडुरे, बसवराज नागनाथ बोरेगाव, राकेश सुभाष मुगळे, संतोष हणमंत माळी, सचिन शामराव सासवे, बसवराज प्रभू पिशानकोट, शुभम दिंडुरे, विजय कापसे, महेश बोरूटे, बाबुराव हडपद, सागर आडवीतोट आदी सोळाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरीकडे बेकायदेशीरपणे गोहत्या केल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला आहे. गुडूलाल मशाक शेख, सिराज शेख यांच्यासह सैफन अल्लाऊद्दीन काझी, आसीफ दौलत बागवान, जहीर बशीर शेख आदी सहाजणांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगले हे पुढील तपास करीत आहेत.
जिल्ह्यात गोहत्येच्या हेतूने जनावरांची वाहतूक करताना करमाळा येथे एका तरुणावर झुंडीने हल्ला झाला होता. तसेच समाजमाध्यमावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी अक्कलकोटमध्ये तिघा तरुणांचे अपहरण करून झुंडीने हल्ला करण्यात आला होता.