रत्नागिरी : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाच्या ऐतिहासिक परंपरेनुसार रत्नागिरी पोलिसांतर्फे सशस्त्र सलामी देण्यात आली. कोकणात होणा-या शिमगोत्सवामध्ये फक्त रत्नागिरीच्या श्री देव भैरीबुवाला देण्यात येणारी पोलिसांची सशस्त्र सलामी पहाण्यासाठी शहर परिसरातील हजारो नागरिक झाडगाव येथील श्री देव भैरीबुवाची पालखी असलेल्या सहाणे जवळ एकत्रित येतात. रत्नागिरीतील झाडगाव येथील श्री देव भैरीबुवाची पालखी असलेल्या सहाणेवर ही ऐतिहासिक परंपरा पार पाडली जाते.
ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या या प्रथेला १२५ वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी गाव गा-हाणे घातल्यावर चार पोलिसांची सशस्त्र सलामी देण्यात येते. यावेळी ट्रस्टी, मानकरी, गुरव मंडळी आणि बारा वाड्यांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजेरी लावतात. श्री देव भैरी जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टच्या शिमगोत्सवाचा समारोप रंग खेळून आणि नियोजित ग्रामप्रदक्षिणेने जल्लोषात करण्यात आला.
येथे होळीच्या रात्री १२ वाजता भैरीबुवाची पालखी वाजत-गाजत मंदिराबाहेर आली आणि मध्यरात्री १२ च्या सुमारास पुन्हा मंदिरात विराजमान करण्यात आली. यानंतर गाऱ्हाणे घालण्यात आले आणि या शिमगोत्सवाचा समारोप करण्यात आला. बुधवारी सकाळपासूनच पालखी उठणार असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी करण्यास सुरुवात केली. दुपारी भैरीबुवाच्या पालखी आणि बरोबर उभ्या केलेल्या होळीच्या शेंड्यावर गुरव मंडळींनी धुपारत दाखवल्या नंतर भैरीबुवाला गाऱ्हाणे घालण्यात आले. यानंतर रत्नागिरी पोलिसांनी सशस्त्र सलामी दिल्यानंतर येथील शिमगोत्सवाची सांगता करण्यात आली.