पाणी मीटर दुरुस्त करण्यात अभियंता दलाने दाखविलेल्या हलगर्जीपणामुळे लष्कराला सुमारे पावणेपाच कोटी रुपयांचा नाहक भरुदड सोसावा लागल्याची बाब नागपूर येथे उघडकीस आली आहे. लष्कराच्या अखत्यारीतील कामटी छावणी मंडळाला नागपूर महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. या वितरणाचे मापन करण्यासाठी उपरोक्त विभागाने मीटरची सहा वर्षे दुरुस्ती न केल्याने पाणी देयकापोटी ही वाढीव किंमत मोजावी लागली. महापालिकेने नवीन मीटर बसवून दिल्यानंतर या भरुदडातून लष्कराची आता कुठेशी सुटका झाली आहे.
कामटी छावणी मंडळ परिसरास पाणीपुरवठा करण्यासाठी नागपूर महापालिका आणि लष्करी अभियंता दल यांच्यात रीतसर करार झालेला आहे. त्यानुसार जेथून हे पाणी घेतले जाते, तेथे अभियंता दलाने स्वत:च्या खर्चाने मीटर बसवून त्याच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारणे क्रमप्राप्त होते. त्या अनुषंगाने मीटर बसविले गेले, परंतु पुढे ते नादुरुस्त झाले. यामुळे नागपूर महापालिकेने कामटी छावणी मंडळातर्फे पंपाद्वारे दररोज किती तास पाणी घेतले जाते आणि तत्पूर्वीचा सरासरी पाणी वापर यांचा ताळमेळ घालून पाणी देयक आकारणी सुरू केली. थोडीथोडकी नव्हे, तर सलग सहा वर्षे याच पद्धतीने आकारणी झालेली देयके कामटी छावणी मंडळ नित्यनेमाने भरत होते. ज्या वेळी नवीन मीटर बसविले गेले, तेव्हा छावणी मंडळाचा प्रत्यक्षातील पाणी वापर आणि नागपूर महापालिका गृहीत धरीत असलेला पाणी वापर यामध्ये कमालीची तफावत असल्याचे निष्पन्न झाले. यावरून महापालिकेने जादा देयकाची आकारणी केल्याचे उघड झाले; तथापि करारातील अटी व शर्तीवर बोट ठेवत महापालिकेने लष्कराचा हा दावा अमान्य केला.
या घटनाक्रमात लष्कराच्या ज्या विभागावर नादुरुस्त मीटर दुरुस्त करण्याची अथवा बदलविण्याची जबाबदारी होती, त्या अभियंता दलाचा गलथानपणा कारणीभूत ठरला. त्यांच्या दुर्लक्षामुळे कामटी छावणी मंडळाला कित्येक वर्षे वाढीव पाणी देयकाचा बोजा सहन करावा लागला. या प्रक्रियेत नियमित देयकापेक्षा सुमारे ४.७० कोटी रुपये जादा दिले गेल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या संदर्भात नागपूर महापालिका पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अजिजू रहेमान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पालिकेने करारातील निकषानुसार पाणीपट्टीची आकारणी केल्याचे स्पष्ट केले.
कामटी छावणी मंडळाचे पाणी मीटर नादुरुस्त होते. त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे उपरोक्त काळात पालिकेने नियमानुसार पाणीपट्टी आकारणी केल्याचा दावाही त्यांनी केला. गेल्या वर्षी पालिकेने उपरोक्त ठिकाणी नवीन मीटर बसवून या वादावर पडदा टाकला. मात्र, अतिशय किरकोळ त्रुटीमुळे लष्कराची कोटय़वधींची रक्कम पाण्यात गेली आहे.
लष्कराचे पाच कोटी रुपये पाण्यात
पाणी मीटर दुरुस्त करण्यात अभियंता दलाने दाखविलेल्या हलगर्जीपणामुळे लष्कराला सुमारे पावणेपाच कोटी रुपयांचा नाहक भरुदड सोसावा लागल्याची बाब नागपूर येथे उघडकीस आली आहे. लष्कराच्या अखत्यारीतील कामटी छावणी मंडळाला नागपूर महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो.
First published on: 28-05-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army 5 crore rs waste in water meter repair