पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे एजंट उपराजधानीत असल्याची माहिती देऊन स्थानिक पोलिसांची  दिशाभूल करणारा लष्करातील शिपाई पंकज शिवराम येरगुडे याला मिलिटरी इंटेलिजन्सद्वारा (एमआय) अटक करण्यात आली आहे. तो मूळचा चंद्रपूर जिल्ह्य़ातील भद्रावती येथील रहिवासी असून सध्या हिमाचल प्रदेशातील योल येथे सैन्याच्या पुरवठा विभागात (ऑक्सिलरी सप्लाय) शिपाई  पदावर कार्यरत आहे.

गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका धार्मिक स्थळाच्या परिसरातून वारंवार पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेशी सॅटेलाईटद्वारा संपर्क साधण्यात येत असल्याचा संदेश काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांना प्राप्त झाला होता.  हा संदेश देण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल क्रमांक पंकजचा होता. त्याच्या विविध क्रमांकावरून गणेशपेठ पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून स्वत:ला एमआयचा मेजर असल्याचे तो सांगत होता. ८ नोव्हेंबरच्या रात्री एमआयने भालदरपुरा  येथून दोन संशयीतांना ताब्यात घेतल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्याचे नागपूर पोलिसांनी खंडन केले. शहरात अशाप्रकारचे कोणतेही अभियान राबवण्यात आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यासंदर्भात एमआयकडूनही या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. नागपूर पोलिसांची दिशाभूल करणारे फोन पंकजच्या मोबाईलद्वारे करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याचे लोकेशन घेण्यात आले असता तो हिमाचल प्रदेशात असल्याचे निष्पन्न झाले. तो लष्करातील रसद पुरवठा विभागाच्या योल येथील छावणीत शिपाई पदावर कार्यरत आहे. एमआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली असून याची माहिती नागपूर पोलिसांना कळवली आहे.