तालुक्यातील गारगुंडी येथील कोटय़वधी रुपये किमतीच्या शासकीय जमिनी गिळंकृत केल्याप्रकरणी गावचे सरपंच, तीन माजी सरपंच, तीन ग्रामसेवक व चार शिक्षकांसह ३२ जणांवर पारनेर पोलिस ठाण्यात अखेर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र सुरुवातीला गुन्हे दाखल करण्यास व आता गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यास पोलिसांकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या आरोपींवर लाचलुचपत प्रतिबंधात्मक कायद्यान्वयेही गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारदारांनी केली होती. परंतु ती फेटाळण्यात आल्याने अरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करण्यात येतो.  
गारगुंडी ग्रामपंचायतीमध्ये दप्तरात हेराफेरी करून कोटय़वधी रुपयांच्या शासकीय जमिनी ग्रामसेवकांना हाताशी धरून पदाधिका-यांनी गिळंकृत केल्या होत्या. या प्रकरणी माजी सरपंच रंगनाथ फापाळे, हरिदास फापाळे व प्रशांत झावरे यांनी तक्रारी केल्या होत्या. तक्रारीनंतर चौकशी अधिका-याची नेमणूक करण्यात आली. या चौकशीत अनेक गैरव्यवहार उघडकीस आले असून अनेक पदाधिका-यांसह ग्रामसेवकही दोषी आढळून आले.
फापाळे व झावरे यांनी केलेल्या तक्रारीनंतर मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल चौकशी अधिका-यांनी दिला होता. गटविकास अधिका-यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे पत्र पारनेर पोलिसांना दिले होते. परंतु पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्याने तक्रारदारांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे तक्रार केली. नवाल यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले, परंतु या पत्रालाही पोलिस प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आली होती.
पोलिसांकडून भ्रष्ट पदाधिकारी तसेच ग्रामसेवकांना पाठीशी घातले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी गृह सचिव, अप्पर पोलीस विशेष अधीक्षक यांना पत्र पाठवून पारनेर पोलिसांच्या मनमानीकडे लक्ष वेधले. त्यानंतर तक्रारदारांनी न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली, त्याने पारनेर पोलीस ठाणे खडबडून जागे झाले. दि. ७ मेला पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. सन २००१ ते २०१२ या बारा वर्षांच्या काळातील हा गैरव्यवहार आहे.
गुन्हे दाखल करण्यात आलेले पदाधिकारी, ग्रामसेवक व शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. विद्यमान सरपंच अंकुश झावरे, माजी सरपंच झुंबराबाई ठुबे, बाळकृष्ण झावरे व बबन झावरे, ग्रामसेवक एस. एल. चोखंडे, प्रकाश जाधव व गोवर्धन जाधव तसेच सुनील फापाळे, लहानू झावरे या शिक्षकांसह शंकर आनंदा फापाळे, लहू फापाळे, प्रमिला फापाळे, संगीता फापाळे, सविता फापाळे, शांताराम फापाळे, ज्ञानदेव फापाळे, श्रीकांत गुंजाळ, पोपट गुंजाळ, बालम शेख, नामदेव फापाळे, पोपट फापाळे, रेखा फापाळे, बाबुराव फापाळे, बबई फापाळे, सुनीता झावरे, उषा गिरी, सुनीता फापाळे, दिलीप ठुबे, नंदा ठुबे, पांडुरंग झावरे, रामभाऊ झावरे आणि भागूबाई झावरे.

Story img Loader