परभणी : पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जनता दरबारात तब्बल ६५० अर्जदारांनी आपल्या तक्रारी सादर केल्या. एवढ्या प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद जनता दरबाराला मिळाल्यानंतर पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना सर्व प्रलंबित अर्जाबाबत तात्काळ निर्णय घेण्यास सांगितले. प्रत्येक अधिकाऱ्याला ‘पालकमंत्री टास्क फोर्स’ या उपक्रमाच्या माध्यमातून एक गाव दत्तक दिले जाणार आहे. अशी माहिती परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. जनता दरबाराच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.पालकमंत्री टास्क फोर्सच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस सर्वच उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. परभणी जिल्हा सुशासन निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम प्रभावीपणे कशा पध्दतीने राबविण्यात येतील, याबाबत पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी बैठकीत सविस्तर आढावा घेतला. तर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात कोणकोणते उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले याबाबतची माहिती दिली.

अधिकाऱ्यांसाठी ‘एक गाव दत्तक’ मोहीम

पालकमंत्री म्हणाल्या की, शिक्षण, शेती, आरोग्य ही महत्त्वाची क्षेत्र आहेत, या क्षेत्रात आपला जिल्हा अग्रक्रमांकावर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. शासनाच्या अनेक चांगल्या योजना आहेत, या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याला पालकमंत्री टास्क फोर्स या उपक्रमाच्या माध्यमातून एक गाव दत्तक दिले जाणार आहे. यासोबतच शाळाही दत्तक दिली जाणार आहे. त्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून दोन वेळा गावाला भेट देऊन कामाची पाहणी करावी. हे काम अतिशय उत्स्फूर्त आणि दक्षतेने प्रत्येक अधिकाऱ्यांनी करुन आपल्या जिल्ह्याचा नावलौकीक वाढवावा.जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी परभणी जिल्ह्यात “अधिकाऱ्यांना एक गाव दत्तक” ही मोहिम अतिशय यशस्वीपणे राबविली जाईल, अशी ग्वाही दिली.

Story img Loader