कारागृहात नेण्याकरिता आलेल्या पोलीस पथकातील उपनिरीक्षकावर टिप्पर गँगच्या ‘मोक्का’तील गुंडाने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. त्यात पोलीस उपनिरीक्षक एम. गावित हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नवीन नाशिक परिसरात काही वर्षांपासून टिप्पर गँगने धुमाकूळ घातला आहे. या गँगला नेस्तनाबूत करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी गँगच्या म्होरक्यासह काही जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली. त्यात समावेश असलेला समीर पठाण हा सध्या नाशिकरोड कारागृहात आहे. गेल्या महिन्यात प्रकृती अस्वास्थ्यतेच्या कारणामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर पठाणची प्रकृती सुधारल्याने त्याला शुक्रवारी कारागृहात नेले जाणार होते. त्याला नेण्यासाठी अंबड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक एम. गावित हे पोलीस पथक घेऊन रुग्णालयात आले असता आरोपी समीर व त्याचे वडील नासीर पठाण यांनी कारागृहात परत जाण्यास नकार दिला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता समीरने हातातील बेडय़ांसह थेट गावित यांच्यावर हल्ला केला. बेडय़ांचा मार लागल्याने गावित यांचे डोके फुटले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी समीर व त्याचे वडील नासीर यांना तातडीने ताब्यात घेतले. दरम्यानच्या काळात या घटनेची माहिती सरकारवाडा पोलीस ठाण्यास कळविण्यात आली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गावित यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. याप्रकरणी सरकारवाडा ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.