ठाकरे गटाचे कोकणातील आमदार राजन साळवी यांच्या घरी आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी धाड टाकली. राजन साळवी यांच्या चार मालमत्तांच्या ठिकाणी शोधकार्य सुरू आहे. राजन साळवी यांचं घर, त्यांचं जुनं घर, त्यांच्या भावाचं घर आणि त्यांच्या हॉटेलमध्ये धाडसत्र सुरू असल्याची माहिती राजन साळवींनी दिली. दरम्यान, त्यांच्याकडे ११८ टक्क्यांनी जास्त बेकायदेशीर मालमत्ता सापडल्याने ही चौकशी सुरू असल्याचं समोर आलं आहे. यासर्व प्रकरणात त्यांना उद्धव ठाकरे यांनीही फोन करून दिलासा दिला आहे. याबाबत त्यांनी माध्यमांना माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजन साळवी म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मला तातडीने फोन केला. त्यांनी विचारपूस केली. म्हणाले राजन तुझ्या पाठिशी संपूर्ण महाराष्ट्र आहे. याचा मला अभिमान आहे.

कर्ज फेडायला सरकारकडे पैसे मागतो

ते पुढे म्हणाले, गुन्हा दाखल झाल्याने अटक होणारच आहे. पण मी अटकेला घाबरणारा नाही. अधिकाऱ्यांनी ११८ टक्के जादा संपत्ती दाखवली आहे, त्यामुळे मी आमचं कर्ज फेडण्याकरता आता सरकारकडे पैसे मागतो, असंही ते मिश्किलीत म्हणाले.

हेही वाचा >> “ज्या दिवशी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर…”, एसीबीचे छापे पडल्यानंतर राजन साळवींची पहिली प्रतिक्रिया

मी शिवसेनेच्या आंदोलनातून उभा राहिलेला कार्यकर्ता

गेल्या दीड वर्षांपासून राजन साळवी यांनी सहा वेळा एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली. तसंच, आज कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अधिकारी थेट घरात धडकले. अशा परिस्थितीतही राजन साळवी शांत आणि संयमी दिसले. त्यांच्या या शांत स्वभावाविषयी पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, “आतापर्यंत मी घाबरलेलो नाही. मी शिवेसनेच्या आंदोलनातून उभा राहिलेला कार्यकर्ता आहे. मला माहित होतं या घटना घडणार आहेत. एसीबी अधिकाऱ्यांची रत्नागिरीत पावलं पडत होती याची माहिती मला मिळत होती. आज ते माझ्या निवासस्थानी येणार हे मला माहित होतं.

शिंदे गटाचा आमच्यावर दबाव

“मी आज लोकप्रतिनिधी आहे. माझ्याकडून तुमच्यादृष्टीने (एकनाथ शिंदेंच्या) काही चुकीचं घडलं असेल, मी शिंदे गटाबरोबर गेलो नाही म्हणून माझ्यावर राग काढला असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, अटक करा, काहीही करा. पण माझ्या पत्नीला आणि मुलावर गुन्हा दाखल करताय हे साफ चुकीचं आहे. तुम्हाला जनता घाबरणार नाही. शिंदे गटात आम्ही जात नाही त्यामुळे आमच्यावर दबाव आहे”, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest me but my wife and son rajan salvi reacts to acb raids sgk