महाराष्ट्रात कारगाड्या किंवा लहान वाहनांना टोलमधून २०१५ मध्येच वगळण्यात आले असून त्यांच्यावर कर आकारला जात नाही, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून राज्यात सोमवारी वाद सुरू झाला. फडणवीस धादांत खोटे बोलत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
“आमचे कार्यकर्ते टोल नाक्यांवरून उभे राहून लहान वाहनांवर कर आकारणी होऊ देणार नाहीत. त्यांच्याकडून कर घेतल्यास हे नाके जाळून टाकू,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला. यानंतर राज्यात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि विविध टोल नाक्यांवरून आंदोलने केली.
हेही वाचा : “तुमची साथ असती तर…”, सुप्रिया सुळेंची अजित पवार गटाला साद? म्हणाल्या, “माझ्या भावांना…”
यावरून वकील गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी केली आहे. “राज ठाकरेंची दादागिरी चालून देणार नाही. १५४ कलमांतर्गत कष्टकरी जनसंघाने राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करून अटक करावी,” असं गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं.
हेही वाचा : “सत्तर वर्षे काँग्रेस झोपा काढत होती का?” राहुल गांधींना लक्ष्य करत आठवलेंचा सवाल
याला आता मनसे नेते संदीप देशपांडेंनी गुणरत्न सदावर्तेंना प्रत्युत्तर दिलं आहे. “सदावर्तेंची वकिली बंद आहे. त्यांना कुणी विचारत नाही. म्हणून सदावर्ते असे प्रकार करतात. जास्त लक्ष देऊ नका,” असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.