महिला आयोगातून बोलतोय, असे म्हणून प्रकरण तडजोडीने मिटविण्यासाठी उद्योजक देवदत्त मोरे यांच्या पत्नी अर्चना मोरे यांच्याकडे 25 कोटींची खंडणी मागणार्या परंडा तालुक्यातील आरणगाव येथील बाळराजे तौर-पाटील यास आनंदनगर पोलिसांनी शनिवारी शहरातील न्यायालयासमोरून अटक केली आहे. रविवारी त्यास न्यायालयात हजर केले जाणार असून पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
मी महिला आयोगातून बोलतोय, तुमच्या पतीविरुद्ध रेखा मोरे ही देवदत्त मोरे यांची पत्नी म्हणून तुमच्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे. प्रकरण तडजोडीने मिटवायचे असेल तर 25 कोटी रुपये द्या, अन्यथा मिडियात तुमच्या पतीची व तुमची बदनामी करू, अशी धमकी देणार्या बाळराजे तौर-पाटील व रेखा भालशंकर यांच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात 4 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हापासून आरोपींचा शोध सुरू होता. मोरे दाम्पत्याने कायदेशीररित्या दत्तक घेतलेल्या मुलीबद्दल रेखा भालशंकर हिने फेसबुकवर बदनामीकारक मजकूर पोस्ट केला होता.
1 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत महिला आयोगातून बाळराजे तौर-पाटील बोलतोय म्हणून अर्चना मोरे यांना फोनवर धमकीचे फोन आले होते. महिला आयोगाकडे रेखा यांनी तक्रार दिली आहे. आम्हाला तुमच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल. तडजोड करून प्रकरण मिटवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, तुमचे पती मुख्यमंत्र्यांना जरी भेटले तरी ते काहीही करू शकणार नाहीत. तुमच्या पतीचा भुजबळ करून जेलमध्ये टाकू, तेंव्हा तडजोड करायची असेल तर रेखा आणि आम्हाला मागीतलेली रक्कम द्या, अशा शब्दात धमकी देऊन खंडणीची मागणी केल्याप्रकरणी तौर पाटील यांच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शनिवारी आनंदनगर पोलिसांनी परंडा तालुक्यातील आरणगावचा रहिवाशी असलेल्या बाळराजे तौर पाटील यास जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेतली आहे. त्यास रविवारी न्यायालयात दाखल करण्यात येणार असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दासरवाड यांनी सांगितले.