महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा वेश परिधान करत ‘रॉ’ गुप्तचर यंत्रणेचा अधिकारी असल्याचे सांगून कास रस्त्यावर तोतयागिरी करणाऱ्या गवडी (ता.सातारा ) येथील एकास अटक करण्यात आली आहे. नयन घोरपडे (सध्या रा. शनिवार पेठ, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

महाशिवरात्री निमित्त सातारा कास रस्त्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुजीत भोसले व नितीराज थोरात हे पेट्रोलिंग करीत असताना, दुचाकीवरून दोन युवक गेलेल त्यांना दिसले. त्यापैकी दुचाकीस्वाराने महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा गणवेश परिधना केला होता. या युवकाची हालचाली संशयास्पद असल्याचे जाणवल्याने त्या दुचाकीचा पाठलाग करून त्यांना थांबवण्यात आले. अधिक चौकशी केली असता त्याने आपण गुप्तचर यंत्रणा रॉ एजंट असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस दलाबाबतची अधिक माहिती विचारली असता त्याला सविस्तर माहिती देता येत नव्हती. म्हणून त्याचावरील संशय अधिक बळावल्याने त्यास चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

या ठिकाणी पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी व कर्मचाऱ्यांनी त्याची अधिक चौकशी केली. यानंतर त्याचे खरे रूप समोर आले. यावर पोलीस नाईक सुजीत भोसले यांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केल्याने, सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नयन घोरपडे याने सातारा शहरात काही ठिकाणी आपण ‘रॉ’ एजंट असल्याचे सांगून तोतयागिरी केली असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. सातारा पोलिसांनी नयन घोरपडेच्या अंगावरील फौजदाराचा गणवेश जप्त केला आहे.

Story img Loader