येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता सतीश चिखलीकर याची मालमत्ता दिवसागणिक ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे घेत असून अहमदनगर येथील दोन बँकांसह नव्याने सापडलेल्या तीन ‘लॉकर’मध्ये साडेनऊ किलो सोने, साडेपाच किलो चांदी आणि ५८ लाख रुपये रोख असा एकूण तीन कोटी ३७ लाख २९ हजारांचा ऐवज आढळून आला आहे. यामुळे चिखलीकरच्या आतापर्यंत आढळून आलेल्या मालमत्तेचा आकडा १७ कोटी ५५ लाख ८० हजारांवर जाऊन पोहोचला आहे. या प्रकरणात सार्वजनिक पाटबंधारे विभागातील काही अधिकाऱ्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील, असेही या विभागाने सूचित केले आहे.
कोटय़वधींची रोकड आणि सोन्या-चांदीचे कित्येक किलो दागिने, अशी डोळे दिपविणारी माया सापडलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता चिखलीकर आणि शाखा अभियंता जगदीश वाघ या दोघांची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपुष्टात येत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक राज खिलनानी यांनी नाशिकला भेट देऊन संशयितांची चौकशी केली. चिखलीकरने ज्या ज्या ठिकाणी बदली झाली, तेथे मालमत्तेमध्ये गुंतवणूक केली होती. नाशिकला बदली होण्यापूर्वी चिखलीकर नगरमध्ये कार्यरत होता. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी नगरमधील दोन बँकांमधील लॉकरची तपासणी केली होती. त्यातील एका लॉकरमध्ये ५६ लाख ६९ हजार तर दुसऱ्या लॉकरमध्ये एक लाख रुपये रोख तसेच नऊ किलो ५५८ ग्रॅम सोने आढळून आले. त्यात सहा किलो ३१२ ग्रॅम सोन्याची बिस्किटे व तीन किलो ३४६ ग्रॅम सोन्याचे दागिने यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी दिली. या दागिन्यांची किंमत दोन कोटी ६७ लाख रुपये आहे. याशिवाय, तिसऱ्या लॉकरमध्ये अडीच लाख रुपये किमतीची पाच किलो ६६ ग्रॅम चांदी सापडली. यामुळे चिखलीकरकडे आतापर्यंत सापडलेली एकूण मालमत्ता १७ कोटी ५५ लाखांहून अधिक झाल्याचे डॉ. महावरकर यांनी सांगितले. रोख रक्कम व सोन्या-चांदीत मोठी गुंतवणूक करणाऱ्या चिखलीकरच्या संपूर्ण राज्यात २६ मालमत्ता असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्यात शेतजमिनी, भूखंड, गाळे, कारखाना, आलिशान वाहने आदींचा समावेश आहे. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमविण्यास लोकसेवकाला मदत केल्याच्या कारणावरून चिखलीकरची पत्नी स्वाती यांच्याविरुद्धही कारवाई होऊ शकते, असे संकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिले आहेत.
चिखलीकरची मालमत्ता १८ कोटींच्या उंबरठय़ावर
येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता सतीश चिखलीकर याची मालमत्ता दिवसागणिक ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे घेत असून अहमदनगर येथील दोन बँकांसह नव्याने सापडलेल्या तीन ‘लॉकर’मध्ये साडेनऊ किलो सोने, साडेपाच किलो चांदी आणि ५८ लाख रुपये रोख असा एकूण तीन कोटी ३७ लाख २९ हजारांचा ऐवज आढळून आला आहे.
First published on: 10-05-2013 at 03:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrested maha pwd executive engineer property around rs 18 crore