धाराशिव, दि. २१ : कला शिक्षकाने दिलेला स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज मंजूर करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या संस्था सचिवाला शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचखोर संस्था सचिव धनाजीराव ज्ञानदेव पेठेपातील याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला गजाआड करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथील नागनाथ गल्ली येथील रहिवासी असलेले धनाजीराव पेठेपतील तुळजापूर येथील रावसाहेब जगताप कर्णबधीर विद्यालयाचे सचिव आहेत. तक्रारदार रावसाहेब जगताप कर्णबधीर विद्यालयात कला शिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती मंजूर करण्यासाठी संस्थेकडे विनंती अर्ज सादर केला होता. संबंधित तक्रारदार असलेल्या कला शिक्षकाचा स्वेच्छा सेवानिवृत्ती अर्ज मंजूर करण्यासाठीचा ठराव घेण्याकरिता लाचखोर सचिव धनाजीराव पेठेपाटील याने तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष तब्बल १ लाख ५५ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानुसार तक्रारदाराने धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. स्वेच्छा सेवानिवृत्त अर्ज मंजूर करण्यासाठी रावसाहेब जगताप कर्णबधीर विद्यालयाच्या  रक्कम पंचासमक्ष स्वतः स्विकारली असता त्यास लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याच्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शुक्रवारी तक्रारदाराने धाराशीव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे भ्रमणध्वनींवर संपर्क साधुन तक्रार दिली होती. त्यानुसार तुळजापूर येथील आरोपीच्या कार्यालयात पडताळणी केली असता आरोपीने पंचासमक्ष १ लाख ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडले. यावेळी आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ६ हजार १८० रुपयांची रोकड आणि अंदाजे १ तोळा वजनाची सोन्याची अंगठी मिळून आली. आरोपीच्या घराचीही घरझडती सुरु आहे. रात्री उशिरा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचखोर आरोपी पेठेपाटील याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातील मोबाईल जप्त करण्यात आला असून पुढील निरीक्षण करुन तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे.

Story img Loader