राज्यपाल बैस यांचे चार दिवसांच्या साताऱ्यातील महाबळेश्वर दौऱ्यावर आगमन
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श असल्याचे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. राज्यपाल रमेश बैस यांचे साताऱ्यातील महाबळेश्वरच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी वाई हेलिपॅडवर आगमन झाले.यावेळी वाई- खंडाळा – महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील व जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.
यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी ते पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या इंडियन रेड क्रॉस सोसायटीने उभारलेल्या वाई येथील बेल एअर हॉस्पिटल ला भेट दिली.तेथे संचालक फादर टॉमी यांनी त्यांचे स्वागत केले.व्यवस्थापक जितीन जोश, डॉ. सुनील पिसे, डॉ. सिजो जॉन, डॉ. मंगला अहीवळे, डॉ. नरेंद्र तावडे, डॉ. शयाल पावसकर, डॉ. रेश्मा नदाफ यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल श्री बैस यांनी रुग्णालयातील विभागांची सविस्तर माहिती घेऊन शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग, लॅबोरेट्री, सिटी स्कॅन, एक्सरे, जनरल वॉर्ड या विभागानं भेट देऊन पाहणी केली. यावेळी फादर टॉमी यांनी रुणालयाच्या कामकाजाची माहिती दिली. या रुग्णालयाने शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने च्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी उपचार सुरू केले आहेत. परंतु याची परवानगी मिळाली नसल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले. एवढ्या ग्रामीण भागात असे हॉस्पिटल उभारल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलेयानंतर राज्यपाल श्री बैस यांनी भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट दिली. भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, उपसरपंच सुनिता भिलारे, सदस्य वंदना भिलारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
पुस्तकांचे गाव भिलार पहायला मिळाले हे सौभाग्य असल्याची भावना व्यक्त करून राज्यपाल श्री. बैस म्हणाले, या गावातील लोकांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. देशातील नागरिकांसाठी ज्ञानाचे भांडार खुले केले आहे. आजकालच्या इंटरनेटच्या जगात लोकांचे पुस्तक वाचन कमी झाले आहे. पण या गावात लोकांनी पुस्तकांसाठी राहत्या घरातील जागा दिली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. संपूर्ण गाव म्हणजेच ग्रंथालय असणे ही एक आगळीवेगळी आणि आनंदाची गोष्ट असल्याची भवना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी राज्यपाल श्री बैस यांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यालयास भेट देऊन पुस्तकाचे गाव या संकल्पनेची माहिती घेतली. तसेच गावातील शशिकांत भिलारे, वंदना भिलारे यांच्या घरातील पुस्तकालयास ही भेट दिली. त्यानंतर सायंकाळी राज्यपाल बैस यांचे महाबळेश्वर मुक्कामी राजभवन येथे आगमन झाले.