सोलापूर : सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी एकाच दिवशी एक लाख ७७९७ क्विंटल कांद्याची इतकी मोठी आवक झाली. त्यामुळे कांदा दर आणखी घसरून सर्वसाधारण दर १७०० रुपये मिळू शकल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडल्याचे पाहावयास मिळाले.

अलिकडे कांदा आवक वाढत असताना कृषिउत्पन्न बाजार समितीचे प्रशासन कोलमडत आहे. त्यामुळे कांदा लिलाव अधुनमधून बंद ठेवावे लागत आहेत. परिणामी, दुसऱ्या दिवशी कांद्याची आवक जवळपास दुप्पट होत असल्याचे दिसून येते. मागील आठवड्यात आलटून पालटून दोन दिवस कांदा लिलाव बंद होता. गेल्या सोमवारी कांद्याची आवक वाढून एक लाख २२ हजार ५२४ क्विंटलपर्यंत वाढली होती. त्यादिवशी दरात घसरण होऊन सरासरी १५०० रुपये ते २१०० रुपयांपर्यंत कमी दर मिळाला होता. केवळ सात क्विंटल उत्कृष्ट कांद्याला प्रतिक्विंटल ४१०० रुपये दर मिळाला होता.

हेही वाचा – उद्याचा माथाडी कामगार संप पुढे ढकलला, नागपूर येथील बैठकीत निर्णय 

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस भुजबळांना बळ देत आहेत, हा भाजपासाठी…”, मनोज जरांगे-पाटलांचा इशारा

दर कोसळत असल्यामुळे कांद्याची ही रडकथा बुधवारी पुन्हा समोर आली. सुमारे शंभर गाड्या भरून शेतकऱ्यांनी एक लाख ७७९७ क्विंटल कांदा बाजारात आणला असता लिलावाचे नियोजन पुन्हा कोलमडले. दुपारी उशिरापर्यंत कांदा लिलाव सुरूच होता. त्यातील दर घसरणही कायम राहिली.

Story img Loader