लातूर : गेल्या महिन्याभरापासून चिंचेची आवक लातूर व उदगीर बाजारपेठेत सुरू झाली असून यावर्षी गतवर्षीपेक्षा चिंचेला दुप्पट भाव आहे. गेल्या वर्षी चिंचेला बारा हजार ते 14000 प्रतिक्विंटल भाव होता यावर्षी तो 30000 पर्यंत पोहोचला आहे .उन्हाळ्यात दरवर्षी सुमारे दोन महिने चिंचेची आवक असते. दक्षिण भारतात दररोजच्या खाण्यात चिंचेचा वापर असतो त्यामुळे लातूरची चिंच हैदराबाद ,चेन्नई ,बेंगलोर या बाजारपेठेत पाठवली जाते .

सध्या लातूर बाजारपेठेत सुमारे एक हजार क्विंटल चिंचेची आवक आहे .लातूर परिसरात चिंचेच्या नावावरून गावाची नावे आहेत .पान चिंचोली, सायाखान चिंचोली, तपसेचिंचोली ,बल्लाळ नाथ चिंचोली अशा अनेक गावांना चिंचेची नावे आहेत. त्यातही पान चिंचोली गावची चिंच ही मराठवाड्यातच अतिशय नावाजलेली आहे. शेतीत उत्पन्नाचे साधन म्हणून चिंचेच्या झाडाची जोपासना केली जाते व अनेक शेतकऱ्यांना चिंचेतून दरवर्षी लाखापेक्षा अधिक उत्पन्न मिळते. यावर्षी चिंचेची लागण कमी आहे, मागणी अधिक व पुरवठा कमी या तत्त्वामुळे चिंचेला बाजारपेठेत चांगला भाव मिळतो आहे.

Story img Loader