पंढरपूर : “पंढरीस जाता प्रेम उचंबळत…आनंदे गर्जते नामघोष… या अभंगाप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे विठू नामाच्या गजरात सोलापूर जिल्ह्यात्त आगमन झाले. सातार जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात माउलींच्या पालखीचे टाळ मृदुंग आणि हरीनामच्या जयघोषासह मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. माउलींच्या पालखीचे आज पहिले गोल रिंगण, तर दुसरीकडे जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करून अकलूज येथे गोल रिंगण होणार आहे.
संतांच्या पालख्या लाडक्या विठूरायाच्या पंढरीच्या समीप येऊन पोहोचल्या आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने मोठ्या लवाजम्यासह धर्मपुरी येथून प्रवेश केला. या वेळी सातारा जिल्हा प्रशासनाने निरोप दिला तर दुसरीकडे सोलापूर प्रशासनाने पालखीचे स्वागत केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यांच्यासह खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, अकलूजचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – “त्यांना देशाची नाही, मुलाबाळांची चिंता,” बावनकुळे असे का म्हणाले?
धर्मपुरी येथे पालखी स्वागतानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माउलींच्या रथाचे सारथ्य केले. रथामध्ये त्यांच्या समवेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित होते. यानंतर प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधींनी हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर पालखी विसावा ठिकाणापर्यंत चालण्याचा आनंद लुटल. माउलींची पालखी नातेपुते येथे विसावली. तर दुसरीकडे जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी आज म्हणजे शनिवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. आज अकलूज येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीला गोल रिंगण होणार आहे. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण पुरंदवडे येथे शनिवारी म्हणजे आज होणार आहे.