अभिजात शास्त्रीय संगीताची मेजवानी देणारा कला-संगीत महोत्सव येत्या २५ ते २७ जानेवारी या काळात थिबा पॅलेसच्या प्रांगणामध्ये रंगणार आहे.
आर्ट सर्कल, रत्नागिरी या संस्थेतर्फे आयोजित होणाऱ्या या दर्जेदार उपक्रमाचे यंदा सहावे वर्ष असून महोत्सवाचा प्रारंभ २५ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता पं. राजन व साजन मिश्रा यांच्या गायनाने होणार आहे. उत्तर भारतातील बनारस घराण्याच्या ख्याल प्रकारात युगल गायकी सादर करणाऱ्या मिश्रा बंधूंनी अनेक राष्ट्रीय मैफली गाजवल्या आहेत. प्रसिध्द नर्तिका झेलम परांजपे यांच्या शिष्या पूर्णिमा डहाळे महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (२६ जानेवारी) ओडिसी नृत्य सादर करणार असून त्यानंतर पं. मिलिंद तुळणकर (जलतरंग), हरविंदर कुमार शर्मा (सतार) आणि पं. रामदास पळसुले (तबला) यांची मैफल रंगणार आहे.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवसाचा प्रारंभ (२७ जानेवारी) जयपूर-अत्रौली घराण्याच्या प्रसिध्द गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने होणार असून पं. रविशंकर यांचे पट्टशिष्य पं. विश्वमोहन भट्ट यांच्या मोहनवीणा वादनाने महोत्सवाचा समारोप होणार आहे. हवाईयन गिटार या वाद्याचा सतार, सरोद आणि वीणा या अस्सल भारतीय वाद्यांच्या तंत्राशी मेळ घालत भट्ट यांनी मोहनवीणा या वाद्याची निर्मिती केली आहे.
 थिबा राजवाडय़ाच्या परिसरात उत्कृष्ट प्रकाश योजना करुन उभारण्यात येणाऱ्या खुल्या रंगमंचावर हा महोत्सव साजरा होणार आहे. संपूर्ण जिल्’ाात अशा प्रकारचा आणि दर्जाच्या या एकमेव महोत्सवाला रत्नागिरीकरांकडून सातत्याने वाढता प्रतिसाद आहे. महोत्सवाच्या प्रवेशिका येत्या २० जानेवारीपासून शहरात विविध केंद्रांवर उपलब्ध होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा