आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पुढाकाराने गेल्या दोन वर्षांपासून जिल्हय़ात जलसंधारणाची कामे हाती घेत जलजागृती अभियान राबवले गेले. यात गावोगावच्या लोकांनी सहभाग दिला. मांजरा साखर कारखान्याने योगदान दिले. त्यातून आता तावरजा नदीचे पुनरुज्जीवन होत असल्याची माहिती आमदार दिलीपराव देशमुख, अॅड. त्र्यंबकदास झंवर व आर्ट ऑफ लिव्हिंगचे मकरंद जाधव यांनी पत्रकार बैठकीत दिली.
मांजरा कारखान्याचे अध्यक्ष धनंजय देशमुख, ‘रेणा’चे अध्यक्ष यशवंत पाटील, ‘साई शुगर’चे अध्यक्ष राजेश्वर बुके, आमदार वैजनाथ िशदे आदी या वेळी उपस्थित होते. गेल्या वर्षी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पुढाकाराने लातूर तालुक्यातील कातपूर, बाभळगाव व शिरूर अनंतपाळ येथे जलसंधारणाची कामे प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आली. यात ५० टक्के लोकवाटा ग्रामस्थांनी उचलला व ५० टक्के निधी आर्ट ऑफ लिव्हिंगने देऊ केला. या कामामुळे परिसरात पाण्याचा प्रश्न मिटला. त्यामुळे जिल्हय़ात आर्ट ऑफ लिव्हिंगकडे जलसंधारणाची कामे हाती घेण्याबाबत मागणी वाढू लागली. चालू वर्षी २५ किमी अंतराच्या तावरजा नदीचे पुनरुज्जीवन लोकसहभागातून करण्याची योजना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी मांडली, त्यास लोकांनी चांगला सहभाग दिला. मांजरा कारखान्यानेही यात आíथक भार उचलला.
लातूर तालुक्यातील शिऊर येथे २ मार्चला नदीतील गाळ काढण्यास सुरुवात झाली. ६० मीटर रुंद व २ मीटर खोल असा १२ किमी ७५० मीटर अंतरावरील १५ लाख ३० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. या पात्रात १ मीटर उंचीइतके पाणी साठवले गेले, तर ते २०० कोटी लीटर असेल व भूगर्भात ९२० कोटी लीटर पाणी वाढेल. नदीपात्राशेजारच्या ३१ हजार लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल व काठावरील ५ हजार एकर शेती १०० टक्के सिंचनाखाली येईल. २ मार्च ते ७ जुलै दरम्यान १२८ दिवस काम झाले. या कामावर सुमारे २ कोटी रुपये खर्च झाले. यातील ५० टक्के लोकवाटा ग्रामस्थांनी उचलला. ज्यांची शेती नाही अशा गावांत शेतमजुरांनीही आर्थिक सहभाग दिला.
‘मांजरा’ने ३३ लाख ६८ हजार १८८ रुपये खर्च करून शिऊर, आलमला, गंगापूर, उंबडगा, पेठ, बुधोडा व बाभळगाव या गावांत काम केले. जि.प.नेही सहभाग दिला. नदीपात्रातील आलमला, शिऊर येथे गॅबियन बंधारे बांधले. जुने कोल्हापूर बंधारे दुरुस्त केले. जि.प.नेही स्वतंत्रपणे ५० लाख रुपये जलसंधारणावर खर्च केले. सामाजिक वनीकरण विभागातर्फे गाळ काढलेल्या नदीच्या दोन्ही पात्रांच्या बाजूने ३० हजार झाडे लावली जाणार आहेत. जि.प.च्या पुढाकाराने नदीच्या पात्रात ४० िवधनविहिरी घेतल्या जाणार आहेत.
जिल्हय़ात झालेले काम पाहण्यास आर्ट ऑफ लिव्हिंगच्या १४ जिल्हय़ांतील लोक येऊन गेले. त्यांनी आपापल्या ठिकाणी असे काम करण्याचा संकल्प सोडला. आयआयटीच्या (पवई, मुंबई) अभियंत्यांनीही पाहणी केली. नदीपात्राशिवाय गंगापूर, समसापूर, नागरसोगा व भादा या गावांतही जलसंधारणाची कामे झाली. त्याची लांबी १५ किमीची आहे. याही ठिकाणी लोकांनी सहभाग दिला. या कामासाठी सुमारे ३८ लाख रुपये खर्च झाले आहेत.
स्वयंसेवी संस्था, साखर कारखाना व जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून झालेले हे काम महाराष्ट्रासाठी पथदर्शक आहे. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे हे काम थांबवले असून, पुढील वर्षी उर्वरित १२ किलोमीटर नदीपात्राचे काम पूर्ण केले जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा