अहिल्यानगरः रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळातून कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रमाचे शिक्षण उपलब्ध करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज, रविवारी चिचोंडी पाटील (ता. अहिल्यानगर) येथे बोलताना सांगितले.

रयत शिक्षण संस्थेच्या चिचोंडी पाटील येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची नवीन इमारत देणगीदार व ग्रामस्थांच्या मदतीतून उभारण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन आज शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. भगीरथ शिंदे होते. आमदार आशुतोष काळे, महेंद्र घरत, माजी आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादा कळमकर, डॉ. अनिल पाटील, कुलगुरू डॉ सर्जेराव निमसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ आदी उपस्थित होते.

नव्या पिढीला ज्ञानाच्या सागरात आणण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजाच्या मदतीतून संस्थेची उभारणी केली. अनेक दानशूर या संस्थेला मदत करत आहेत. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काळजी घेतली जात आहे, असेही शरद पवार म्हणाले.

आमदार आशुतोष काळे यांनी संस्थेच्या शाळातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागेल अशी सूचना केली. संस्थेचे उपाध्यक्ष ॲड भगीरथ शिंदे म्हणाले, संस्थेकडे ३ हजार शिक्षकांची कमतरता भासते. त्यावर ८० ते ९० कोटी रुपये खर्च होतात. राज्य सरकारने हा खर्च करायला हवा, परंतु तो संस्थेला करावा लागत आहे. यावेळी महेंद्र घरत, आबा कोकाटे, सरपंच शरद पवार, डॉ. संजय कळमकर आदींची भाषणे झाली.

परिसर हिरवा करा

चिचोंडी पाटील गाव व शाळेचा उजाड परिसर पाहून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ग्रामस्थांनी परिसर हिरवागार करण्याचे आव्हान स्वीकारावे, असे आवाहन केले.