कृत्रिम पावसासाठी विमानात काही अत्याधुनिक बदल करण्यासाठी हे विमान कोल्हापूरहून बंगळुरूला नेण्यात आले आहे, तर सी डोपलर रडार अजूनही बोस्टन शहरातच आहे. ते भारतात आणण्यासाठी आणखी ४ दिवस लागतील. ही यंत्रणा मुंबईला आणल्यानंतर एक दिवसात ती औरंगाबादला आणली जाईल. साधारण शुक्रवापर्यंत (दि. ३१) विमान येथे येण्याची शक्यता आहे. या विमानातून रसायने फवारण्यासाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रणा अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आपत्ती निवारण विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी दिली.
कृत्रिम पावसासाठी आवश्यक परवानगी मिळविण्याची प्रक्रिया केली जात आहे. स्फोटक परवान्यासह त्याचा साठा करण्यास लागणाऱ्या परवान्यासह येणाऱ्या रासायनिक पदार्थास विमानतळावरून बाहेर आणण्यासाठी लागणारे परवानेही मिळविले जात आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होईल व त्याच आठवडय़ात प्रयोग हाती घेतले जाणार आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयावर सी डोपलर रडार बसविण्यासाठी आवश्यक ती तयारी सुरू असल्याचेही दिवसे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून आभाळ भरून येत असले, तरी पाऊस काही पडत नसल्याने चिंतेत भर पडली आहे. पिकांची चिंता सोडून आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावेल की काय, अशी स्थिती बीड, लातूर, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यांतील काही तालुक्यांत निर्माण झाली आहे. त्यामुळे होईल तेवढे लवकर कृत्रिम पाऊस पाडला जावा, अशी भावना निर्माण झाली आहे. पाऊस नसल्याने रानावनातील पशुपक्ष्यांचे हाल सुरू झाले आहेत. जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणीही पुढे रेटली जात आहे. त्यामुळे कृत्रिम पावसाच्या मागणीचा जोर वाढू लागला आहे. दिवसेंदिवस स्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र असल्याने आता कृत्रिम पावसावर बरेच काही अवलंबून असणार आहे. या साठी आवश्यक ती सर्व सोय करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितले. डोपलर रडार यंत्रणा आल्यानंतर एक-दोन दिवसांत प्रयोग हाती घेतला जाऊ शकतो.
आजही ११२३ टँकर सुरू
मराठवाडय़ात आजही १ हजार १२३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, शेतीकर्ज व दुबार पेरणीच्या धास्तीने आतापर्यंत ४८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ३२ लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणीपैकी सुमारे १० लाख हेक्टर पेरणी दुबार करावी लागण्याची शक्यता आहे. तसे अहवाल महसूल यंत्रणेकडे आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा