अलीकडच्या काळात जिल्ह्य़ात थोडय़ाफार प्रमाणावर पाऊस झालेला असला तरी दुष्काळसदृश परिस्थिती संपलेली नाही. या परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात अल्प पावसाच्या भागात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे काम तीन महिने चालणार आहे. या संदर्भात सकारात्मक अहवाल येताच कृत्रिम पावसाचा प्रयोग जालना जिल्ह्य़ातही केला जाईल, असे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी येथे स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणानंतर भाषणात सांगितले.
आमदार अर्जुन खोतकर, राजेश टोपे, नारायण कुचे यांच्यासह नगराध्यक्ष पार्वताबाई रत्नपारखे, जि. प. अध्यक्ष तुकाराम जाधव आदी उपस्थित होते. लोणीकर म्हणाले, जिल्ह्य़ात कमी पावसाने काही ठिकाणी पिके हातची गेल्याने दुबार पेरणीची वेळ आली आहे. गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणावर आहे. आवश्यकतेनुसार छावण्या उभारणे आणि शेजारच्या राज्यांतून चारा आणण्याचे काम केले जाईल. जिल्ह्य़ात सध्या दीडशे टँकर सुरू असून स्थानिक मागणीनुसार ते उपलब्ध करवून दिले जातील. सध्या जिल्ह्य़ात रोजगार हमीच्या २३२ कामांवर १ हजार ४३९ मजूर असून मागणी करताच पंधरा दिवसात काम देण्यात येणार आहे. केशरी शिधापत्रिका असलेल्या ४४ हजारांवर कुटुंबांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसाठी दोन रुपये किलोप्रमाणे गहू व तीन रुपये किलोप्रमाणे तांदूळ स्वातंत्र्यदिनापासून देण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मोहिमेच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून दोन वेळेस जालना शहरात महास्वच्छता अभियान राबवून ७७२ टन कचरा उचलण्यात आला. सात हजार नागरिकांनी त्यात भाग घेतला.
जिल्ह्य़ात जलयुक्त शिवार योजनेखाली २ हजार ३४ कामे पूर्ण झालेली असून ९६४ प्रगतिपथावर आहेत. शासनाच्या तिजोरीवर भर न टाकता उद्योजकांच्या सहकार्याने राज्यात हवेतून पाणी शोषून घेणारी १०० आकाश अमृत यंत्रे आली आहेत. २०१४ च्या खरिपातील नुकसानभरपाईपोटी जिल्ह्य़ातील ३ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना २३१ कोटींचे अनुदान वाटप केले. चालू हंगामात ३१ जुलैपर्यंत ५९४ कोटी म्हणजे उद्दिष्टाच्या ६६ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. १९ हजार शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन केले आहे. चार लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जवळपास २७ कोटी रुपयांचा पीक विमा भरून घेण्यात आला आहे, असेही लोणीकर म्हणाले.

Story img Loader