तब्बल ४५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मराठवाडय़ात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडतानाच बीड व नगर जिल्हय़ांच्या सीमावर्ती भागात २० रासायनिक फ्लेअर्सचा मारा करीत कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आला. शेवगाव (नगर), तसेच बीडच्या शिरूर व माजलगाव तालुक्यांतील पाडळी, राजुरीतांबा व लिंबागणेश या तीन गावांवर या पर्जन्यरोपणाचा परिणाम काही अंशाने दिसून आल्याचा दावा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला. पर्जन्यछायेच्या प्रदेशात दोन कायमस्वरूपी कृत्रिम पावसासाठीची आपत्ती व्यवस्थापन केंद्रे सुरू ठेवावीत, असा विचार आहे. त्यातील एक औरंगाबादचे केंद्र कायमस्वरूपी असेल, असे खडसे यांनी सांगितले.
गेल्या १५ दिवसांपासून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांच्यासह अमेरिकेतील कंपनीच्या साहाय्याने सहा जणांचे पथक औरंगाबाद येथे आले. दुपारी १ वाजून १० मिनिटांनी कृत्रिम पावसासाठी विमानाने उड्डाण केले. नगर जिल्हय़ातील शेवगाव, बीड जिल्हय़ातील माजलगाव व गेवराई तालुक्यांत पाऊस पाडण्याच्या क्षमतेचे ढग आहेत काय, याची चाचपणी करण्यात आली. दुपारी दोनच्या सुमारास शेवगाव तालुक्यात घेण्यात आलेल्या पर्जन्यरोपण चाचणीचा प्रयोग काहीअंशाने यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला. एक मिलिमीटर पाऊस नोंदवला गेल्याचे नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कळवल्याचे दिवसे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
ज्या भागात निसर्गत: पाऊस पडत आहे, तेथे हा प्रयोग हाती घेतला जात नाही. त्यामुळे व जालना जिल्हय़ात हा प्रयोग मंगळवारी होऊ शकला नाही. सिल्व्हर आयोडाईड आणि सोडियम क्लोराईड या रसायनांचा मारा ढगांवर करण्यात आला. तांबारारोजी, लिंबागणेश व पाडळी या भागांत पाऊस पडला की नाही हे उद्या समजेल, असे पत्रकार बैठकीत आवर्जून सांगण्यात आले. लिंबागणेशचे सरपंच बाळासाहेब मुळे यांच्याशी संपर्क साधला असता दुपारी तीनच्या आसपास पावसाची भुरभुर सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
अडीचशे किलोमीटर परिसरातील ढगांची स्थिती नीटपणे कळावी, यासाठी येणारे सी डॉप्लर रडार गुरुवापर्यंत (दि. ६) औरंगाबाद येथे दाखल होईल, असेही खडसे यांनी सांगितले. कार्गो विमान नसल्याने हे रडार हाँगकाँग येथे अडकल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी भारतात २३ ठिकाणी पर्जन्यरोपणाचे प्रयोग झाले होते. ते सकारात्मक असल्याचा दावा करण्यात आला होता. पुढील ९० दिवस अशा पद्धतीचे दिवस मराठवाडय़ात हाती घेतले जाणार आहेत. विशेषत: लातूर, बीड आणि उस्मानाबाद या तीन जिल्हय़ांत पाऊस पडावा यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल, असा दावा या वेळी करण्यात आला. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी निधी पांडे आदींची उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा