कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रडारची उभारणी औरंगाबाद शहरात युद्धपातळीवर सुरू असून, उद्या (शनिवार) दुपापर्यंत याचे काम पूर्ण होईल.
रडार येथे आणल्यापासून लगेच त्याची उभारणी वेगाने सुरू झाली असली, तरी मुळातच त्याच्या सॉफ्टवेअर-हार्डवेअरची  जुळवणी करणे हे अतिशय क्लिष्टकारक काम आहे. गुरुवारी दुपारपासून संबंधित कर्मचारी रात्रीचा दिवस करून प्राधान्याने हे काम करीत आहेत. व्यवस्थित टय़ुनिंग सेट केल्यानंतर कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला पूरक कार्य सुरू करता येईल. उद्या दुपापर्यंत रडारचे उभारणीचे काम पूर्णत्वास येईल, असा अंदाज राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
दरम्यान, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्य़ांत शुक्रवारी विमानातून ढगांमध्ये रसायनांची फवारणी करण्यात आली. लातूरमध्ये अपेक्षित परिणाम झाला नसला, तरी मुळात लातूर जिल्ह्य़ात ढगांचे चित्र कृत्रिम पावसासाठी सध्या तरी अनुकूल नाही. उस्मानाबाद जिल्ह्य़ातही रसायनांचा मारा करण्यात आला. तुळजापूर तालुक्यात ८ ठिकाणी रसायनांची फवाराणी करण्यात आली. यातील ३ ठिकाणी चांगला, तर ३ ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडल्याची तत्परतेने माहिती मिळाली. अन्य २ ठिकाणी मात्र पाऊस पडला नाही. या बरोबरच नगर जिल्ह्य़ातही विमानातून रसायनांचा मारा करण्यात आला. तेथील माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा