कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध उत्पादक संघामध्ये कोणताही गैरकारभार झालेला नाही. विरोधी आघाडीतून ४ संचालक निवडून आले असून त्यापैकी ३ संचालक संघाच्या कामकाजात सक्रीय सहभागी आहेत. केवळ संचालिका शौमिका महाडिक याच वैयक्तिक राजकीय हेतूने प्रेरित होऊन संघाच्या दूध उत्पादकांची दिशाभूल करत आहेत, असे प्रत्युत्तर गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिले. शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या कारभारावर टीका केली होती. त्यावर डोंगळे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, महाडिक यांनी हेतुपुरस्सपणे संघाच्या चाचणी लेखापरीक्षणाची मागणी केल्यानेच आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महाडिक यांनी सर्वात प्रथम आपण विरोधक आहोत या भूमिकेतून बाहेर यावे आणि गोकुळच्या विकासात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावे.
हेही वाचा : “जनतेसाठी नाही तर आपली दुकानं बंद होतील ती वाचवीत म्हणून ‘इंडिया’तले पक्ष…”, देवेंद्र फडणवीसांची टीका
गोकुळने दूध उत्पादकांसाठी भरीव कामगिरी केल्यानेच लेखापरिक्षकांनी ‘अ –वर्ग’ दिला आहे, याबाबत त्यांनी नोंद घेणे गरजेचे आहे. गोकुळ दूध संघाशी निगडीत सर्व घटक अहोरात्र आपले योगदान देत आहेत. यासाठी संचालिका महाडिक यांनी केलेल्या प्रत्येक सूचनेचे स्वागत आहे. आमची बांधिलकी ही दूध उत्पादक शेतकऱ्यांशी असून त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. गोकुळच्या सिलबंद निविदा संचालक मंडळाच्या सभेमध्ये सर्वांसमोर खोलल्या जातात. निविदा दराचा तुलनात्मक तक्ता तयार करून संचालक मंडळ सभेत कमी दरासाठी कामाचा ठेका दिला जातो, असेही डोंगळे म्हणाले.