कुख्यात डॉन अरुण गवळी याला न्यायालयाने पॅरोल मंजूर केला असला तरी कागदपत्रांअभावी त्याची शनिवारी मध्यवर्ती कारागृहातून सुटका होऊ शकली नाही. सुटकेसंबंधीची कागदपत्रे कारागृहात पोहोचलीच नसल्याचे कारागृह अधीक्षकांनी सायंकाळी सांगितले.
मुंबईतील एका नगरसेवकाच्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला अरुण गवळी सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याच्या मुलाचे पुढील आठवडय़ात लग्न आहे. त्यासाठी त्याने संचित रजेसाठी कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला होता. विभागीय आयुक्तांनी विविध कारणास्तव रजा नाकारली. त्यास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने त्याची रजा मंजूर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना गुरुवारी दिले होते. शुक्रवारी शासकीय सुटी होती. त्यामुळे शनिवारी त्याची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता होती. मात्र, मुख्यमंत्र्यांचा आज वर्धा जिल्ह्य़ात दौरा असल्याने विभागीय आयुक्तांना तेथे जावे लागले. ते कार्यालयात नसल्याने त्यांची स्वाक्षरी कागदपत्रांवर होऊ शकलेली नाही. सायंकाळी कारागृहाचे अधीक्षक डॉ. भीमदास ढोले गवळीची सुटका होऊ शकत नसल्याचे सांगितले.

Story img Loader