कुख्यात डॉन अरुण गवळीला पॅरोलवर सुट्टी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे अरुण गवळीला तुरुंगातच राहवं लागण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी अरुण गवळीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार, मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी अरुण गवळीला सुट्टी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे अरुण गवळीला धक्का बसला असून तुरुंगातच राहावं लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या याचिकेवरील पुढची सुनावणी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. अरुण गवळीने वयाचे कारण देत सुट्टी देण्याची मागणी केली होती. गँगस्टर अरुण गवळीला न्यायालयाने दिलेल्या मुदतपूर्व सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आता याच प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार असून नोव्हेंबरमध्ये या प्रकरणावरील सुनावणी न्यायालय दोन्ही बाजू ऐकणार आहे. नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येच्या प्रकरणात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. याच गुन्ह्यात अरुण गवळी नागपूर तुरुंगात शिक्षा भोगत आहे. यामध्ये १४ वर्ष शिक्षा अरुण गवळीने भोगली असून आता ६५ पेक्षा जास्त वय असल्यामुळे शिक्षेतून सुटका करण्यात यावी, अशी मागणी अरुण गवळीच्या वकिलाकडून करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कमलाकार जामसंडेकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, २ मार्च २००७ या दिवशी संध्याकाळी पावणेपाचला मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर दिवसभरातली कामं संपवून त्यांच्या घरात टीव्ही पाहात होते. असल्फा व्हिलेजच्या रुमानी मंजिल चाळीत ते राहात होते. कमलाकार जामसंडेकर यांनी त्यावेळी अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणेंचा ३६७ मतांनी पराभव केला होता. कमलाकार जामसंडेकर यांच्या पत्नी कोमल या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. जामसंडेकर यांची भाची मनाली हिरे स्वयंपाक घरात काम करत होती. इतक्यात घराबाहेर दोन मोटरसायकल येऊन थांबल्या होत्या. त्यावरुन चार लोक उतरले. त्यातला एकजण हा जामसंडेकर यांच्या घराकडे आला आणि त्यांच्या घरात शिरला. त्याने त्याच्याकडच्या बंदुकीने जामसंडेकर यांच्यावर पिस्तुलाने गोळीबार केला. हा गोळीबार अत्यंत जवळून म्हणजेच पॉईंट ब्लँक रेंजवरुन करण्यात आला. गोळीबार झालेला पाहून मनाली धावत बाहेर आली तेव्हा कमलाकार जामसंडेकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिला दिसले. तिने मदतीसाठी धावा केला.

जामसंडेकर यांच्यावर गोळीबार झाल्याचं कळताच गर्दी जमा झाली. त्या गर्दीचा फायदा घेऊन हल्लेखोर तिथून पळाले. कमलाकार जामसंडेकर यांना रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला. मात्र पोलिसांना सुगावा लागत नव्हता. पोलीस मात्र कसून चौकशी करत होते. त्यावेळी त्यांना समजलं की या हत्येचे धागेदोरे एका आमदारापर्यंत पोहचले आहेत. अर्थातच तो होता डॉन अरुण गवळी. त्यामुळे याच प्रकरणात अरुण गवळीला अटक झाली. कमलाकार जामसंडेकर यांच्या हत्येनंतर जवळपास वर्षभराने ही बाब उघड झाली होती की ही सुपारी अरुण गवळीने दिली आहे. अरुण गवळी त्यावेळी भायखळा मतदारसंघाचा आमदार होता.

Story img Loader