तांत्रिक विद्येचा कथित उपयोग करीत बळी घेतल्याची खळबळजनक घटना वर्धा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना ताब्यात घेतले आहे. अब्दुल रहीम अब्दुल मजीद, अब्दुल जुनाईद, अब्दुल जमीर अब्दुल रहीम अशी या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्वी येथील विठ्ठलवार्ड परिसरात हा अघोरी प्रकार १८ मे रोजी घडला. यानंतर १९ मे रोजी रात्री गणेश तुकाराम सोनकुसरे यांनी तक्रार दाखल केली. गणेश सोनकुसरे (रा. बेलपुरा, अमरावती) यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला उपचारासाठी वरील तीन आरोपीकडे नेले होते. त्यांनी तांत्रिक उपचार केले. शेवटी संगनमत करीत गळा आवळून ठार केले. याबाबत पोलिसांना माहिती न देता मृतदेह फिर्यादीच्या हवाली केला. त्याची तक्रार कोतवाली अमरावती पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यानुसार आर्वी पोलिसांनी कारवाई केली आहे.
“मांत्रिकांची सखोल चौकशी करणे आवश्यक”
अखील भारतीय अंनिसचे राज्य संघटक पंकज वंजारे म्हणाले, “या घटनेतील बाबा, मांत्रिकांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. चौकशीत आणखी धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते. यात अंनिसचे संपूर्ण सहकार्य असेल. भविष्यातील अंधश्रध्दांचे बळी थांबतील.”
हेही वाचा : “कुटुंब सुखी ठेवायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव” पुण्यात भोंदू बाबाची विकृत मागणी
आर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोळुंके म्हणाले, “तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आले आहे. पीएम रिपोर्टमध्ये गळा आवळल्याच्या खुणा दिसून येत आहेत. हे गंभीर प्रकरण असून कसोशीने चौकशी होत आहे.”